पुसेसावळीतील घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांनी मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता.
सातारा : विविध सामाजिक संघटनांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत तोंडाला काळ्या फिती लावून पुसेसावळीतील (Pusesawali Riots) घटनेचा निषेध नोंदवला, तसेच अल्पसंख्याक समाजाविरोधात भडकावू वातावरण निर्माण करणारा सूत्रधार विक्रम पावसकर यांना (Vikram Pavaskar) अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची भरपाई द्यावी, घटनेचे फेर पंचनामे करावेत आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. या मागण्या येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत मान्य न झाल्यास त्याच दिवशी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला.
पुसेसावळीतील घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांनी काल मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असल्याने जिल्हा प्रशासनाने मोर्चास परवानगी नाकारली, तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांसह इतर अधिकारी यांच्यासमवेतच्या बैठकीत मूक मोर्चा रद्द करण्याचा निर्णय झाला; पण संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला.
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जमा झाले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणारे निवेदन वाचून दाखविण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शिष्टमंडळाने निवेदन दिले.
विविध सामाजिक संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, की पुसेसावळीत घडलेल्या घटनेची सत्यशोधन समितीची नेमणूक करून चौकशी करावी. अल्पसंख्याक समाजाविषयी सातत्याने गैरसमज निर्माण करणारी वक्तव्ये करून अल्पसंख्याक समाजाविरोधात भडकावू वातावरण करणारा सूत्रधार विक्रम पावसकर यांना अटक करावी. हिंसाचारात बळी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबाला २५ लाख रुपये भरपाई मिळावी.
तसेच पंचनामे व जबाब दबावाखाली झालेले असल्याने ते आम्हाला मान्य नसून फेर पंचनामे करावेत. मागील सहा महिन्यांत जिल्ह्यात प्रक्षोभक पोस्ट सोशल मीडियावर करण्याच्या घटनांची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी दोन ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली असून, त्यावर कार्यवाही झाली नाही तर त्याच दिवशी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.
यावेळी निवेदन देताना शिष्टमंडळात मिनाज सय्यद, विजय मांडके, रजनी पवार, अमजदभाई, ॲड. वर्षा देशपांडे, नरेंद्र पाटील, जमीर शेख, इम्रान शेख, सलीम खान, जुनैद शेख, गणेश भिसे, गुफरान शेख, ॲड. शैला जाधव, सलीम अत्तार, उमेश खंडुजोडे, चंद्रकांत खंडाईत, गणेश कारंडे, कैलास जाधव, दत्ताजीराव जाधव, आरिफ शेख, अविनाश जगताप, माणिक अवघडे, वसंत नलवडे, असलम तडसरकर, विजय निकम, संजय गाडे आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.