सातारा : आठ आणे मजुरीवर ते रेल्वेच्या रुळासाठी खडी फोडायचे. त्यांना कर्मवीरअण्णांच्या विचाराचा आणि शिक्षणाचा परिसस्पर्श झाला अन् रायगड जिल्ह्यातील गव्हाणसारख्या खेड्यातील रामचा रामशेठ झाला. मात्र, ते उतले नाहीत, मातले नाहीत तर देणग्यांचा ढग होऊन ‘रयत’वर बरसत राहिले. त्यांनी दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमुळे ‘रयत’मधील गरिबांच्या मुलांना अनेक सुविधा मिळत आहेत. या ‘राम’वर आज छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मान्यवरांनी कौतुकाचा वर्षाव केला. येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमधील कमवा आणि शिका योजनेचे माजी विद्यार्थी व रायगड जिल्ह्यातील थोर नेते तसेच रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य रामशेठ ठाकूर यांनी शिवाजी कॉलेजमध्ये दहा कोटी रुपये खर्चून उभारलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.(Earn and Learn Scheme in Chhatrapati Shivaji College)
हा कार्यक्रम रामशेठ यांच्या भोवतीच फिरत होता. अगदी श्री. पवार यांनीही भाषणात श्री. ठाकूर यांचे भरभरून कौतुक केले. ‘रायगड जिल्ह्यात अनेक विचारवंत, नेते, सामजिक कार्यकर्ते झाले. मात्र, रामशेठ यांचे नाव घेतल्याशिवाय त्या यादीला पूर्णत्व येऊ शकत नाही. संस्थेत एखादा प्रकल्प राबवायचा म्हटले की, रामशेठ फक्त म्हणतात, त्याला खर्च किती येणार ते सांगा. त्यांनी कायम ‘रयत’शी बांधिलकी जपली आहे, अशा शब्दांत श्री. पवार यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच रामशेठ यांनी संस्थेला आणि संस्थेच्या विविध शाखांना केलेल्या मदतीची यादीच त्यांनी वाचून दाखविली. त्यातून रामशेठ यांनी मिळविलेला कोट्यवधी रुपयांचा कुबेराचा खजिना ‘रयत’साठी खुला केल्याचे स्पष्ट झाले.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी ठाकूर यांच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कामगिरीवर सुंदर भाष्य केले. ‘जोडूनिया धन उत्तम व्यवहारे’ याप्रमाणे त्यांनी ते खर्च केले.'रयत’वर ते कायम पैशाची खैरात करत असल्याचे त्यांनी सांगितले. रामशेठ ठाकूर हे ‘रयत’वर सतत प्रेम करत असून ते ‘रयत’चे एटीएम मशिन असल्याचे डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले. ‘रयत’ला गरज असली आणि केवळ ‘रयत’ हा पासवर्ड टाकला की आम्ही निर्धास्त असतो, असेही त्यांनी नमूद केले.
‘रयत’ हे माझे घर आहे. येथे मी शिक्षण घेतले आणि दातृत्वही शिकलो. येथील संस्कारामुळेच मला जीवनात यश मिळाले आहे. श्री. पवार साहेबांच्या पक्षात मला जाता आले नाही. पण, एकलव्याप्रमाणे त्यांना कायम आदर्श मानत जीवन जगत राहिलो.
- रामशेठ ठाकूर, सदस्य, मॅनेजिंग कौन्सिल, रयत शिक्षण संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.