फलटण शहर : आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीत नीरा-देवघर पाणीप्रश्न, रेल्वे, एमआयडीसी, रस्ते, महामार्ग, बुलेट ट्रेनसारखे अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लागले आहेत. जनतेची ताकद आता आमच्यामागे आहे. त्यामुळे फलटण नगरपरिषद, जिल्ह्यातील पंचायत समित्यांसह जिल्हा परिषदेवर भाजपचाच झेंडा फडकविणार असल्याचा दावा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी करत त्यांनी नातवंडांसोबत घरात राहावे म्हणजे त्यांच्यावर जेलमध्ये जायची वेळ येणार नाही, असा टोला रामराजे नाईक-निंबाळकर यांना लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ सेवा पंधरवडा संवाद मेळावानिमित्ताने आयोजित फलटण येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, माजी जिल्हा परिषद सदस्या ॲड. जिजामाला नाईक- निंबाळकर यांच्यासह भाजपचे जिल्हा, तालुका व शहरस्तरीय पदाधिकारी, नगरसेवक, महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
मालोजीराजे बँक पतसंस्थेला चालवायला दिलीत. कारखाना ‘जवाहर’ला चालवायला दिला. दूध संघाचे वाटोळं केलं, खरेदी-विक्री संघ गायब आहे. फलटण शहर व ग्रामीणमधील जनता विविध समस्या व प्रश्नांमुळे त्रस्त आहे, ही परिस्थिती पाहता तुमचं कर्तृत्व काय? तुम्ही चांगलं काय केलंय, असा सवाल करून खासदार निंबाळकर म्हणाले, ‘कमिन्स कंपनीत कामगारांना सोळा हजार रुपये पगार आहे; परंतु त्या सोळा हजारांतील आठ हजार रुपये रामराजे आपल्या चेल्यामार्फत खातात, असा गंभीर आरोप करत माझ्या कार्यकाळात जेवढा निधी तालुक्याच्या विकासकामांसाठी आणला, ते पाहता तेवढा निधी हेच काय पण त्यांच्या पिढ्याही माझ्याएवढा निधी आणू शकल्या नाहीत व आणूही शकणार नाहीत.
जलजीवन योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना आहे, ती राजे जलजीवन योजना नाही. ही केंद्र सरकारची योजना आहे, त्या केंद्र सरकारचा खासदार जिवंत आहे, त्यामुळे तुम्ही तीन भाऊ त्याचे बोगस नारळ फोडू शकत नाही, या शब्दात विरोधकांना फटकारले. जनतेने जी ताकद दिली आहे, तिचा वापर योग्य रितीने करत मतदारसंघातील प्रत्येक घटकाच्या उज्वल भवितव्यासाठी आपण कार्यरत राहू, असेही खासदार रणजितसिंह यांनी यावेळी सांगितले.
अभी बोलेंगे नही... : आमदार गोरे
फलटण तालुक्यात सत्तेचं केंद्रीकरण झाले आहे. त्यामुळे जनतेने आता भाकरी फिरवली पाहिजे. सत्तेवर गेली तीस वर्षे बसल्याला आता बदलायला हवे. आम्हाला अडचणीत आणण्यासाठी बरंच काही केलं गेलं; परंतु आता सत्ता आमची आहे. आता खुप झालं, अभी बोलेंगे नही...'' असा इशाराच आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी दिला. आपली लढाई प्रस्थापितांविरोधातली आहे. जोवर त्यांचा निकाल लागणार नाही तोवर ती थांबणार नाही, कुस्ती निकालीच करणार असल्याचा निर्धारही श्री. गोरे यांनी बोलून दाखविला व आगामी काळात फलटणचा आमदार हा भारतीय जनता पक्षाचाच असणार, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.