कऱ्हाड (जि. साातारा) : येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या भाडेवाढीला अर्थसंकल्पीय सभेत "जनशक्ती', भाजपसह लोकशाही आघाडीने विरोध करत भाडेवाढ फेटाळली. "लोकशाही'ने स्थायी समितीत भाडेवाढ ठरली नसल्याने ती कोणी केली, असा प्रश्न उपस्थित केला. "जनशक्ती'नेही त्या सुरात सूर मिसळत नगराध्यक्षांकडे बोट केले. नगराध्यक्षांनी प्रशासनाला जबाबदार धरले. प्रशासनही आता आम्ही भाडेवाढ केली नाही, अशा भूमिकेत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या भाडेवाढीने पालिका कारभारातील सगळा सावळागोंधळ समोर आला आहे.
अर्थसंकल्पात काही सुचावयचे असेल तर त्याची स्थायी समितीत चर्चा अपेक्षित असते. त्यात झालेल्या चर्चेनंतर तो मुद्दा मासिक सभेत मांडून त्याला चर्चेअंती मंजुरी किंवा नामंजुरी घ्यायची असते. मात्र, एखादा मुद्दा स्थायी समितीत चर्चेला आला नाही आणि तो थेट अर्थसंकल्पीय सभेत आला तर त्याला जबाबदार कोण, हाच खरा प्रश्न आहे. तीच अवस्था कऱ्हाड पालिकेत निर्माण झाली आहे. अर्थसंकल्पीय सभेत छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या भाडेवाढीचा मुद्दा आला. त्या भाडेवाढीवरून आरोप-प्रत्यारोपही झाले. स्टेडियमची 200 रुपयांपासून 10 हजारांपर्यंतची भाडेवाढ झाली आहे.
खुर्च्या झिजवण्यापेक्षा राजीनामा द्या, आम्ही पालिका चालवून दाखवतो
त्यावर "लोकशाही'चे गटनेते सौरभ पाटील यांनी भाडेवाढ फेटाळली. "जनशक्ती'चे गटनेते राजेंद्र यादव यांनीही काहीच चर्चा न होता थेट भाडेवाढ कशी झाली, असा प्रश्न उपस्थित केला. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनीही भाडेवाढीला विरोध केला. नगराध्यक्षांनी भाडेवाढीबाबत प्रशासनाला जबाबदार धरले. आता पालिका प्रशासनानेही आम्ही भाडेवाढ सुचवली नसल्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे स्टेडियमची भाडेवाढ कळीचा मुद्दा ठरला आहे. नगराध्यक्षांनी त्याची चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत.
साफसफाईच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; शाहूनगरातील 35 जणांवर गुन्हा
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची भाडेवाढ कशी झाली, हे माहीत नाही. अर्थसंकल्प प्रशासनाने केला आहे, त्याबाबत त्यांना विचारता येईल. त्याची सखोल चौकशी करून भाडेवाढ करणाऱ्याला योग्य तो जाब विचारावा लागेल.
- रोहिणी शिंदे, नगराध्यक्षा, कऱ्हाड
स्थायीत समितीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची भाडेवाढीची काहीच चर्चा नव्हती, मग थेट अर्थसंकल्पात वाढ आली कशी? याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई आवश्यक आहे. नगरसेवकांनाही अंधारात ठेवून होणारा कारभार चुकीचा आहे.
- राजेंद्र यादव, गटनेते, जनशक्ती आघाडी
उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत न सुचवणाऱ्या अर्थसंकल्पात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची भाडेवाढ करणे अत्यंत चुकीचे आहे. त्याला दात टोकरून पोट भरणे म्हणतात. स्थायी समितीत चर्चा नसतानाही थेट भाडेवाढ झालीच कशी? त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे.
- सौरभ पाटील, गटनेते, लोकशाही आघाडी
उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून भाडेवाढ सुचवली जाते. मात्र, ती भाडेवाढ प्रशासनाने सुचवलेली नाही. ती थेट अर्थसंकल्पात आली कशी, याचे कोडे आहे. कोठे तरी चर्चा झाल्याशिवाय ती भाडेवाढ अर्थसंकल्पात येणार नाही.
- ए. आर. पवार, नगर उपअभियंता, कऱ्हाड पालिका
Edited By : Siddharth Latkar
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.