IT Hub : सातारा, शिरवळला ‘आयटी हब’साठी आरक्षण

आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत सातारा जिल्ह्यातील जिव्हाळ्याचे रोजगार निर्मितीसंदर्भातील प्रश्न उपस्थित केले.
Uday Samant and Shashikant Shinde
Uday Samant and Shashikant Shindesakal
Updated on

सातारारोड - सातारा येथे ‘आयटी हब’साठी आरक्षण केले असल्याचे स्पष्ट करत शिरवळ येथेही ‘आयटी हब’ उभारणीसाठी निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार शशिकांत शिंदे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत सातारा जिल्ह्यातील जिव्हाळ्याचे रोजगार निर्मितीसंदर्भातील प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, ‘पुसेगाव, निढळ परिसरात २०१४ पासून एमआयडीसी मंजूर असून, पाणीसुद्धा आरक्षित झाले आहे. सर्वेक्षण होऊन दहा हजार एकर भूसंपादन झाले आहे; परंतु अजून पुढील कार्यवाही नाही.

सन २०१३-१४ मध्ये मी लोकप्रतिनिधी असताना औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय घेतला. खटाव तालुक्यातील दुष्काळी भागात औद्योगिक वसाहत निर्माण झाली, तर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. जिल्ह्यात एमआयडीसी विकसित करण्यात येत आहे. त्यामध्ये हा भाग देखील समाविष्ट आहे. सातारा-पुसेगाव रस्त्यालगत ही एमआयडीसी मंजूर आहे; परंतु दुर्दैवाने अजूनपर्यंत या कामाला गती मिळाली नाही.

अंतिम प्रक्रिया करून लवकरात लवकर एमआयडीसी स्थापन करावी, अशी लोकांची मागणी आहे. सातारा येथील महाराष्ट्र स्कूटर्स ही कंपनी बंद पडली आहे. साताऱ्यामध्ये आता डेव्हलपमेंट व्हावी, अशी लोकांची आणि तरुणांची इच्छा आहे. त्यासाठी महाराष्ट्र स्कूटर्सची जागा ताब्यात घेऊन तिथे नवीन इंडस्ट्रीसाठी आपण एखादा नवीन प्रकल्प आणणार का? सातारा येथे आयटी हब निर्माण करणार आहात का, पुण्यापासून जवळ असलेल्या शिरवळला आपण आयटी हब निर्माण करणार का? असे प्रश्न उपस्थित केले.

त्यावर उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, की पुसेगाव एमआयडीसीसाठीचे जमीन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पाण्याच्या आरक्षणाचा निर्णय देखील झाला आहे. आता पुढील कार्यवाहीसाठीही शासन लवकरात लवकर निर्णय घेईल. साताऱ्यामध्ये ‘आयटी हब’साठी आरक्षण केले आहे आणि शिरवळमध्ये देखील आयटी हब करण्यासाठीचा निर्णय घेऊ.

केवळ आयटी हब मंजुरीचा निर्णय न घेता तिथे कंपन्या देखील आणण्याबाबतचे प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा आमदार शिंदे यांनी व्यक्त केली. केसुर्डी परिसरातील पाच-सहा गावांमधील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या; परंतु एमआयडीसीच्या नियमानुसार त्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही, या आमदार शिंदे यांच्या प्रश्नावर यासंदर्भात तपासून निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले.

सातारा येथील महाराष्ट्र स्कूटर्स ही कंपनी बंद आहे. यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासून ही जागा ताब्यात घेण्यासाठी एमआयडीसी प्रयत्न करेल, असे आश्वासन देखील मंत्री सामंत यांनी दिले.

त्याचबरोबर आपण उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांबाबत संबंधितांची बैठक आपल्यासमवेत घेऊन कार्यवाही करू, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

नेरमधील शिक्के उठणार

नेर गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के उठवले नाहीत, असे आमदार शिंदे यांनी निदर्शनास आणून देताच, यासंदर्भात आदेश दिले असून, त्याबाबतही लवकरच कार्यवाही होईल, असे मंत्री सामंत यांनी यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना सांगितल्याची माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.