छंदातून आनंद मिळवणारे सचिन पडवळ

सचिन पडवळ यांनी अनेक सुंदर कलाकृती साकारल्या आहेत
Sachin Padwal who derives pleasure from his hobby
Sachin Padwal who derives pleasure from his hobby
Updated on

सातारा - आंतरिक ओढ माणसाला जास्त काळ स्वस्थ बसू देत नाही. फुरसदीचे क्षण मिळाले की, मन आपोआप त्या ओढीच्या दिशेने झेप घेते. सचिन पडवळ या माजी सैनिकाच्या आयुष्याला हे लागू पडते. देशसेवा बजावून घरी परतल्यावर त्यांचे मन स्वतःच्या छंदाकडे ओढले गेले. त्यातून अनेक सुंदर कलाकृती साकारल्या आहेत.

कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध ज्ञान नसताना केवळ निरीक्षण अन् मेहनतीतून सचिन पडवळ यांनी स्वतःतील कलावंताला सतत जागा ठेवला आहे. चित्रकला, शिल्पकला, काष्ठशिल्पे यात जिवंतपणा ओतला आहे. ते पूर्वाश्रमीचे माजी सैनिक. देशसेवा बजावून घरी परतल्यावर बहुतेकांचा कल अन्य नोकरीत वा व्यवसायात कार्यरत राहण्याचा असतो. सचिन पडवळ यांनी मात्र आपल्या मनात जोपासलेले छंद साकारण्याला प्राधान्य दिले. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग त्यांनी चित्रकला, शिल्पकला, काष्ठशिल्पे, भित्तिचित्रे, व्यंगचित्रे, लेखन यात गुंतवला आहे.

सचिन पडवळ हे सातारा तालुक्यातील शेंद्रे गावचे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. साताऱ्याच्या आयटीआयमध्ये व्यावसायिक शिक्षण सुरू असतानाच ते लष्करात आर्टिलरी ( तोफखाना) विभागात भरती झाले. जम्मू-काश्मीरसह विविध ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. १७ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होऊन ते गावी परतले. त्यांच्यासमोर वेळच वेळ होता. मात्र, नव्या नोकरीऐवजी त्यांनी छंदाचा मार्ग पत्करला. बालपणापासून ते सुंदर चित्रे काढत. निवृत्तीनंतर ते या कलेत रमले. त्याला भित्तिचित्रे, काष्ठशिल्पे, लाकडावरील कोरीव काम यांची जोड लाभली. उल्लेखनीय म्हणजे या कलांतील कोणतीही पदवी वा शास्त्रीय ज्ञान त्यांच्याकडे नाही.

तरीही केवळ प्रबळ इच्छाशक्तीतून त्यांनी कलेचे हे देखणे विश्व साकारले आहे. त्यातून त्यांच्यातील कल्पक कलावंताचे दर्शन घडते. प्रसिद्ध चित्रकार सागर गायकवाड, पत्रकार सत्यनारायण शेडगे, नागठाण्यातील पत्रकार मित्र यांचे सततचे प्रोत्साहन याकामी महत्त्वपूर्ण ठरल्याचे ते नमूद करतात. शेंद्रेचे माजी सरपंच असलेले वडील भानुदास पडवळ, आई छाया, पत्नी रूपाली, मुलगा आयुष, भाऊ अमोल, बहीण वैशाली यांच्या सहकार्याचा उल्लेखही ते आवर्जून करतात.

छंदातून जगण्याचा आनंद

‘छोट्या छोट्या गोष्टींतून जगण्याचा आनंद मिळवता यायला हवा. त्यासाठी कुठला अन् कुठला छंद हवा,’ असे श्री. पडवळ सांगतात. मनातील निर्मळ भावना छंदाची वाट पक्की करतात. दुःखाला, वेदनेला दूर करण्याचे सामर्थ्य छंदात असते. त्यामुळे एखादा तरी छंद माणसाने जोपासायला हवा, असेही ते सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.