सातारा : वीज पुरवठ्यादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यानंतर धोका निर्माण होऊ नये, यासाठी ट्रान्स्फॉर्मरला सुरक्षा कवच बसविण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने घेतला होता. यानुसार येथील ९५ ट्रान्स्फॉर्मरचे सर्वेक्षण करत पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर ५० ट्रान्स्फॉर्मरला सुरक्षा कवच बसविण्यात आले आहेत. या कवचामुळे ट्रान्स्फॉर्मरमधील गरम ऑईल सांडण्यासह शॉर्टसर्किटवेळी उडणाऱ्या ठिगण्यांपासून नागरिकांचा बचाव होणार आहे.
वीज वितरण कंपनीच्या वतीने शहरातील विविध भागांत वीज पुरवठा करण्यात येतो. यासाठीचे वितरण संच आणि ट्रान्स्फॉर्मर वीज दाबाच्या मागणीनुसार विविध ठिकाणी उभारण्यात आले आहेत. वीज वितरणाची कार्यप्रणाली सुरळीत आणि सुरक्षितपणे सुरू राहावी, यासाठी सर्वच ट्रान्स्फॉर्मरमध्ये उच्च प्रतीचे ऑईल वापरण्यात येते. वीज पुरवठ्यादरम्यान दाब वाढल्यास, बिघाड निर्माण झाल्यास गरम ऑईल उसळी घेऊन ट्रान्स्फॉर्मरमधून बाहेर पडण्याबरोबरच शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या उडण्याच्या घटनाही घडतात. यामुळे त्या परिसरातील नागरिकांच्या जिवास धोका होण्याबरोबरच मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
या घटना तसेच त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच वीज पुरवठा पुरविणारे ट्रान्स्फॉर्मर सुरक्षित राहावेत, यासाठीच्या उपाययोजना राबविण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने घेतला होता. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सातारा शहरातील विविध भागांत असणाऱ्या वर्दळीच्या ठिकाणच्या ट्रान्स्फॉर्मरचे सर्वेक्षण करण्यात आले. शाळा, बस स्थानके, मंडई, मुख्य बाजारपेठा, शासकीय कार्यालये आदी प्रामुख्याने गर्दीच्या ठिकाणी असणारे ट्रान्स्फॉर्मर सर्वेक्षणासाठी निवडण्यात आले होते. सर्वेक्षणाअंती ९५ ट्रान्स्फॉर्मरला सुरक्षा कवच बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानुसार पहिल्या टप्प्यात सातारा शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या ५० ट्रान्स्फॉर्मरला सुरक्षा कवच बसविण्यात आले आहेत. हे कवच बसविल्यानंतर ट्रान्स्फॉर्मरची फेरतपासणी करत सुरक्षितेसाठी आणखी कोणत्या उपाययोजना राबवता येतील, याचा आढावा पुन्हा वीज वितरण कंपनीने घेतला. पहिल्या टप्प्यात ५० सुरक्षा कवच बसविल्यानंतर उर्वरित ४५ सुरक्षा कवच बसविण्याची तांत्रिक प्रक्रिया सध्या वीज वितरण कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आली असून, येत्या काही दिवसांत ती पूर्ण होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.