सातारा : पिढ्यान्पिढ्या सातारकर सदाशिव पेठेतील श्रीमंत महागणपती सम्राट मंडळाच्या महागणपतीच्या चरणी लीन होताना आपल्याला दिसतात. १९५२ पासून मंडळात छोटी गणेशमूर्ती बसवली जात होती. सम्राट महागणपतीची स्थापना सन १९६८ मध्ये झाली. महागणपतीच्या मनमोहक रूपाची महती केवळ सातारकरांपर्यंतच नव्हे, तर राज्यासह देशपरदेशात गेली. यामुळेच हजारो भाविक उत्सवकाळात महागणपतीच्या दर्शनास येतात आणि श्रद्धेने गणरायाच्या चरणी यथाशक्ती देणगी आणि वस्तू अर्पण करतात.
महागणपती १५ फूट उंचीचा आहे. महागणपतीस चांदीची आभूषणे परिधान करण्यात आली आहेत. यामध्ये चांदीचा मुकुट, शस्त्र, कान, हात, पाय, जानवे, कडी, हार आदींचा समावेश आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, या सरकारच्या आवाहनास सम्राट मंडळाने प्रतिसाद देत काही वर्षांपूर्वी महागणपतीची फायबरची मूर्ती साकारली. ही मूर्ती वर्षभर मंडळ स्वतःच्या वास्तूत ठेवते.