सातारा (जि. सातारा) : शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची खते व बियाणे मिळणे गरजेचे आहे. निकृष्ट दर्जाचे बियाणे व खते देऊन काही चुकीचे केल्यास संबंधित कृषी सेवा केंद्रांसह कृषी अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी येथे दिला. दरम्यान, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही 50 हजारांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. कर्जमाफीच्या या यादीत जिल्हा परिषद व बाजार समितीच्या सदस्यांना वगळले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या श्री. भुसेंनी सातारा जिल्ह्यातील खरीप हंगामाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री भुसे म्हणाले, ""जिल्ह्यात खरिपाच्या 45 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, काही भागांत सोयाबीनच्या बियाण्याची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तशाच तक्रारी सातारा जिल्ह्यातून आल्यास कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची सूचना केली आहे. खरिपासाठी शेतकऱ्यांना 65 टक्के पीक कर्जवाटप झाले असून, येत्या 15 जुलैपर्यंत 100 टक्के पीक कर्जवाटप पूर्ण होईल.'' महात्मा फुले कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील 49 हजार 209 शेतकऱ्यांना 308 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे, अशी माहिती देऊन ते म्हणाले, ""शेतकऱ्यांना चांगल्या व उत्कृष्ट दर्जाचे बियाणे व खते मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभागाला आम्ही सूचना केल्या आहेत; पण त्यामध्ये काही चुकीचे आढळल्यास कृषी सेवा केंद्र चालकासह कृषी अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल.''
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत नऊ लाख शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यापैकी तीन लाख 42 हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लॉकडाउन संपल्यानंतर जिल्हाधिकारी आढावा घेतील, मगच त्याचे वितरण होईल. शेतीमाल खरेदी केंद्र सुरू करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. त्यांनी आता मका खरेदी केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली होती. हे उद्दिष्ट आम्ही पूर्ण केले असून, आणखी उद्दिष्ट वाढवून मागितले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
प्लॅस्टिकच्या फुलांवर बंदीचा विचार
जिल्ह्यातील काही फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्लॅस्टिकच्या फुलांवर बंदी आणावी, अशी मागणी केली आहे. त्याबाबत श्री. भुसे म्हणाले, ""प्लॅस्टिकच्या फुलांमुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. याबाबत प्लॅस्टिकच्या फुलांवर बंदी आणण्याबाबत विचार सुरू आहे. भंडाऱ्यासाठी वापरण्यात येणारा पिवळ्या रंगाऐवजी हळदीचा वापर करण्याबाबत आम्ही आग्रही आहोत.''
मी तर चोरी केली नाही ः पाटील
साताऱ्याच्या आमदार व खासदार यांनी रेशनच्या धान्याची चोरी केल्याचा मुद्दा पत्रकारांनी मंत्री भुसे यांच्यापुढे मांडला. त्यावर त्यांच्या शेजारीच बसलेले साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, ""मी साताऱ्याचा खासदार आहे. मी काहीही चोरलेले नाही.'' त्यावर एकच हशा पिकला. "आहो तुम्ही नव्हे ते दुसरे साताऱ्याचे खासदार,' असे पत्रकारांकडून सांगण्यात आल्यानंतर या प्रश्नाला मंत्र्यांनी बगल दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.