महाराष्ट्रातील सरकार असो व दिल्लीतील त्यांना मराठ्यांना न्याय हा द्यावाच लागेल.
सातारा : महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे. न्याय हक्काच्या लढाईत मराठ्यांचा आवाज कधीही दडपला जाणार नाही. राज्यातील असो वा केंद्रातील सरकारला मराठ्यांना न्याय द्यावाच लागेल, अशी रोखठोक भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinghraje Bhosale) यांनी उपोषणस्थळी मांडली.
छत्रपती घराण्यावर असलेले समाजाचे प्रेम कोणत्याही पदापेक्षा मोठे नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गुरुवारी (ता. २) शहरातून ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचे आमरण व साखळी उपोषण सुरू आहे.
काल (मंगळवार) जिल्हा बंदची हाक असल्याने तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी जमले होते. त्यामध्ये युवकांची संख्या जास्त होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनीही आज उपोषणस्थळी भेट दिली. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘मी आणि माझे कुटुंब आपल्यासमवेत आहे. आमदार किंवा राजकीय भूमिका मांडण्यासाठी मी येथे आलेलो नाही. सकल मराठा समाजाच्या भावना समजून घेत त्या सरकारपर्यंत पोचविण्यासाठी मी आलो आहे.
हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे. समाजच्या ताकदीमुळेच आम्ही आहोत. हे आंदोलन आता समन्वयकांच्या हाती राहिलेले नाही. ते समाजानेच हाती घेतले आहे. मराठ्यांच्या न्याय्य हक्काची ही लढाई आहे. महाराष्ट्रातील सरकार असो व दिल्लीतील त्यांना मराठ्यांना न्याय हा द्यावाच लागेल. आमच्या घराण्यावर आपल्या सर्वांचे प्रेम आहे.
मी असो वा उदयनराजे शिवछत्रपतींच्या घराण्यावर तुम्ही सर्व जण प्रेम करणारे आहात. त्यामुळे आमदारकी, खासदारकीपेक्षा तुमचे प्रेम महत्त्वाचे आहे. पदे येतात आणि जातात. या कायमच्या गोष्टी नाहीत. या घराण्यावरील तुमचे प्रेम, श्रद्धा कायम राहिली अशा पद्धतीने आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाई तालुक्यातील भुईंज, खटाव तालुक्यातील काटकरवाडी व सातारा तालुक्यांतील क्षेत्र माहुली गावाने राजकीय नेत्यांना बंदी घातली.
सकाळी साडेदहा वाजता वकिलांची न्यायालयापासून बाईक रॅली
अतीत (ता. सातारा) येथील युवकांचा शिवराज तिकाटण्यापासून मोर्चा
आज परळी भागातील गावे, पाटखळ येथील ग्रामस्थ व भजनी मंडळ, बोरखळ, रेणावळे, देगाव, कारंडवाडी, निगडी-पवाराची, कोडोली व जिहे-कठापूर या गावांतील ग्रामस्थांनी उपोषणस्थळी उपस्थित राहात सहभाग नोंदवला. रिपाई ए गटाचे जिल्हाध्यक्ष दादा ओव्हाळ यांनीही आज पक्षाच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा दिला. रात्री धावडशी, नेले-किडगाव येथील युवकांनी शहरातून उपोषण स्थळापर्यंत मशाल मिरवणूक काढण्यात आली. प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करत शांतता राखण्याचे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.