Satara : पाचवडेश्वर पुलाचे भूमीपूजन रात्रीत कॅन्सल; राजकीय दबावाची चर्चा

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यासंदर्भात पत्रकार परिषद घेवुन माहितीही दिली होती
Satara
Satara Sakal
Updated on

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील पाचवडेश्वर ते कोडोली आणि रेठरे बुद्रुक पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल होणार होते. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यासंदर्भात पत्रकार परिषद घेवुन माहितीही दिली होती. त्याचबरोबर गुरुवारी सायंकाळपर्यत मुख्यमंत्र्यांच्या टेंटेटीव्ह दौऱ्यात ते भूमीपूजन घेण्यात आलेलेही होते. मात्र आदल्या दिवशी रात्री फायनल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पाचडेश्वर, रेठरे पुलाचे भूमीपूजन कॅन्सल झाले आणि त्यांच्याऐवजी कृष्णा हॉस्पीटलला भेट असे फायनल झाले. मुख्यंमत्र्यांचे दौऱ्यानुसार कार्यक्रम झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजकीय दबावापोटी पुलाचे भूमिपूजन टाळले की काय ? अशी चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे.

कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघावर गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचीच सत्ता आहे. आमदार चव्हाण यांच्या पुर्वी सलग ३५ वर्षे माजी मंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांनी त्या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांच्यानंतर सध्या आमदार चव्हाण हे प्रतिनीधीत्व करत आहेत. आमदार चव्हाण यांना उंडाळकरांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील यांनी साथ दिली आहे. त्यामुळे कऱ्हाड दक्षिणमधील काँग्रेस सध्या एक आहे.

मात्र भाजप पक्षाच्या माध्यमातुन तेथे अतुल भोसले यांनीही आमदारकीसाठी गेल्या अनेक वर्षापासून जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यांच्या प्रचारासाठी मागील निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सभा घेतली होती. त्याचबरोबर सध्या भाजप आणि शिेदे गटाचे राज्यात सरकार सत्तेवर आहे. कऱ्हाड दक्षिणमध्ये आमदार चव्हाण आणि भोसले गट यांच्यातच प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थासह ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढल्या जात आहेत. आमदार चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात कऱ्हाड व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. त्याचे उद्घाटन काही कारणाने रखडली होती.

त्यातच सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण पुण्यतिथीच्या निमीत्ताने कऱ्हाडच्या दौऱ्यावर येणार होते. तत्पुर्वी मुंबईत महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाची बैठक झाली. त्यामध्ये सदस्य असलेले माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या समोरच मुख्यमंत्री शिंदे यांना कऱ्हाडमधील प्रशासकीय इमारत, नवीन शासकीय विश्रामगृह आणि पाचवडेश्वर ते कोडोली पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रम करण्याची विनंती केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यक्रमास येणार असल्याचे सांगीतल्याचे आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या अगोदर दोन दिवस झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी मंत्री देसाई यांनी जुन्या शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधिक्षक समीर शेख यांच्यासह सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक घेतली. तत्पुर्वी त्यांनी गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याच्या ठिकाणांची अधिकाऱ्यांसमवेत पाहणीही केली. त्यावेळी त्यांनी पाचवडेश्वर-कोडोली पुलाच्या पाचवडेश्वर येथील कार्यक्रमस्थळाचीही पाहणी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या टेंटेटीव्ह दौऱ्यात गुरुवारी सायंकाळपर्यंत पाचवडेश्वर पुल भुमीपुजनाचा कार्यक्रम होता. मात्र त्याच दिवशी रात्री फायनल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पाचडेश्वर, रेठरे पुलाचे भुमीपुजन कॅन्सल झाले आणि कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पीटलला भेट असे फायनल झाले. त्यामुळे कॉग्रेसजणांच्या भुवया उंचावल्या.

मुख्यमंत्र्यांचे काल साडेदहाच्या सुमारास येथील विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री विमानतळावरील व्हीव्हीआयपी कक्षात गेले. तेथे शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भेट मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यादरम्यान काँग्रेसच्यावतीने आमदार चव्हाण, मनोहर शिंदे यांनी त्यांचे स्वागत करुन दोघांनीही पाचवडेश्वर पुलाच्या भूमिपूजन करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी काही तांत्रीक अडचण असल्याचे सांगुन अधिक बोलणे टाळले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे त्यांच्या दौऱ्यानुसारच कार्यक्रम झाले. त्यामध्ये त्यांनी शासकीय विश्रामगृहाचे उदघाटन झाल्यानंतर कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पीटलला भेट दिली. तेथे अतुल भोसले, विनायक भोसले यांनी हॉस्पीटलच्या कामाची माहिती दिली. मात्र मुख्यमंत्र्यांनी पुलाच्या भुमिपुजनाचा कार्यक्रम टाळला. त्यामुळे राजकीय दबावापोटी हा कार्यक्रम थांबला की काय ? अशी चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे. मात्र आमदार चव्हाण यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या पुलाचे कालच भुमिपुजन केले.

मुख्यमंत्र्यांनी चव्हाण, भोसलेंनाही दिला वेळ

आमदार पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात नवीन प्रशासकीय इमारत, सुसज्ज विश्रामगृह बांधण्यात आले आहे. त्याचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभुराज देसाई, आमदार चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट कृष्णा हॉस्पीटलला जावुन भेट दिली. तेथे अतुल भोसले, विनायक भोसले यांच्याकडून तेथील कामकाजाची माहिती घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार चव्हाण आणि अतुल भोसले या दोघांनाही वेळ दिल्याचे त्यांच्या दौऱ्यातुन दिसुन आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.