भाजीविक्रेत्याच्या कन्येने लावले चार चॉंद

Satara
Satara
Updated on

खटाव (जि. सातारा) : भाजीपालाविक्रीचा व्यवसाय करून तब्बल 16 माणसांच्या कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या येथील आरिफ काझी यांची कन्या मलिकाने वर्षभराच्या प्रामाणिकपणे मेहनतीने दहावीच्या परीक्षेत 95.40 टक्के गुण मिळवून समस्त खटावकरांचे हृदय जिंकले आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झुंजण्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या रक्तात असलेल्या या गुणामुळे समस्त खटावकरांसाठी मलिकाचे यश प्रेरणादायी ठरले आहे. 

मलिकाचे वडील आरिफ हे 30 वर्षांपूर्वी घेतलेल्या टीव्हीएसवरून गावोगावी फिरून भाजीपाल्याचा व्यवसाय करून कुटुंब संभाळतात. या व्यवसायातून मिळणाऱ्या तटपुंज्या कमाईमध्ये घरातील चार मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा घरखर्च चालवण्याची अवघड जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडलेली आहे. कला शाखेची पदवी संपादन केल्यानंतर आरिफ यांनी नोकरी मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तथापि दुर्दैवाने नोकरी न मिळाल्याने त्यांनी मिळेल ते काम करून घर चालवण्याचा प्रयत्न केला. पतीचा भार कमी करण्यासाठी आई मिनाज ब्युटीपार्लरचा व्यवसाय करते. 

अशाच परिस्थितीत मलिकाची मोठी बहीण साबिया हिनेदेखील दहावीमध्ये 93 टक्के गुण मिळवले होते. यावर्षी तिने नुकतेच शास्त्र शाखेतून बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. अनायसे आता लॉकडाउनचा काळ असल्याने साबिया शिलाई काम शिकून लहानग्या भावंडांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत घरातील मंडळी काढत असलेल्या मार्गाची जाण ठेऊन मलिकानेही स्वतःला झोकून देऊन मिळवलेले हे यश निश्‍चितच प्रेरणादायी आहे. 

मलिकाला पुढील शिक्षणाची आस तर आहेच; पण त्यासाठी प्रतीक्षा आहे ती आर्थिक बळ देणाऱ्या हातांची. स्वतःची जिद्द आणि मेहनतीच्या जिवावर मिळवलेल्या यशाचे चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील, मुख्याध्यापक बंडोपंत खोत व समस्त खटावकरांकडून कौतुक होत आहे. 

दीदीही माझ्यासाठी "रोल मॉडेल' 

दरम्यान, माझे आई-वडील व मार्गदर्शन करणारे शिक्षक हे माझ्या यशाचे खरे मानकरी आहेत. माझी दीदीही माझ्यासाठी "रोल मॉडेल' आहे, असे मलिका आवर्जून सांगते. 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.