सातारा : व्‍यावसायिक मिळकतींवर सीसीटीव्‍ही

नवीन इमारतीवर बंधनकारक; सुरक्षिततेसाठी सातारा पालिका घेणार निर्णय
satara muncipality
satara muncipalitysakal
Updated on

सातारा : सातारा शहरातील नागरिकांच्‍या सुरक्षिततेला प्राधान्‍य देत वाढणाऱ्या गुन्‍हेगारीला आळा घालण्‍यास पोलिसांना मदत व्‍हावी, यासाठी सातारा नगरपालिका नव्‍याने होणाऱ्या व्‍यावसायिक मिळकतींना सीसीटीव्‍ही बसविणे बंधनकारक करणार आहे. त्यासाठीचा निर्णय पालिकेच्‍या येत्‍या प्रशासकीय मंडळाच्‍या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्‍यात येणार आहे.

गेल्‍या काही वर्षांत सातारा शहराचा विस्‍तार झपाट्याने होत आहे. वाढते नागरीकीकरण आणि वाढत्‍या लोकसंख्‍येमुळे मूलभूत नागरी आणि सामाजिक समस्‍यादेखील दिवसेंदिवस वाढत आहेत. या वाढणाऱ्या समस्‍यांमुळे अनेक वेळा कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍‍न निर्माण होवून साताऱ्यातील संपूर्ण समाजमन अस्‍वस्‍थ झाल्याचे प्रकार घडले आहेत. हे टाळण्‍यासाठी सातारा पोलिस दल सक्रिय असले तरी त्‍यांच्‍या कामावर अनेक तांत्रिक कारणास्‍तव मर्यादा पडत आहेत. संपूर्ण शहर निर्धोक आणि निर्भय राहावे, यासाठीचे प्रयत्‍न पोलिस दल आणि स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था सातत्‍याने करत आहेत. याच अनुषंगाने मध्‍यंतरीच्‍या काळात सातारा पालिका, शाहूपुरी, सातारा शहर पोलिस ठाण्‍याने स्‍वयंसेवी संस्‍था, व्‍यक्‍ती, सहकारी संस्‍था तसेच नगरसेवकांनी स्‍वनिधीतून शहराच्‍या विविध भागांत सीसीटीव्‍ही कॅमेरे बसविले आहेत.

या कॅमेऱ्यांचे संचलन आणि नियंत्रण पोलिस दलाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे. जिल्‍हा नियोजन समितीच्‍या माध्‍यमातून सातारा पोलिस दलास शहरातील विविध भागात उच्‍च दर्जाचे सीसीटीव्‍ही कॅमेरे बसविण्‍यासाठी ४० लाख रुपयांचा निधी देण्‍यात आला होता. त्यातून पोलिस दलाने शहराच्‍या विविध भागात ३२ कॅमेरे बसविले होते. या कॅमेऱ्यांसाठीचा नियंत्रण कक्ष पोलिस मुख्‍यालयात असून त्‍याव्‍दारे शहरातील हालचाली टिपण्‍याचे काम दिवस-रात्र पोलिस कर्मचारी करत असतात. शहरातील विविध भागांत असणाऱ्या कॅमेऱ्यांच्‍या मदतीने व्‍यापला जाणारा भाग कमी असल्‍याने काही प्रकरणांचा तपास करताना पोलिसांवर मर्यादा पडतात. हे टाळण्‍यासाठी तसेच शहरातील नागरिकांच्‍या सुरक्षिततेसाठी सातारा पालिकेने यापुढील काळात शहर आणि विस्‍तारित भागात नव्‍याने होणाऱ्या व्‍यावसायिक मिळकतींना दर्शनी भागात उच्‍च दर्जाचे सीसीटीव्‍ही कॅमेरे बसविण्‍याचे बंधन घालण्‍याचा निर्णय घेण्‍यात येणार आहे. त्यासाठी शहर विकास विभागाच्‍या बांधकाम नियमावलीत बदल करण्‍याच्‍या हालचाली पालिकास्‍तरावर सुरू आहेत. याबाबतचा प्रस्‍ताव पालिकेच्‍या होणाऱ्या प्रशासकीय सभेपुढे मांडण्‍यात येणार असून तो मंजूर झाल्‍यानंतर बांधकाम

परवाना देताना संबंधित अटींची पूर्तता करण्‍याचे आदेश संबंधित बांधकाम व्‍यावसायिकास देण्‍यात येणार आहेत.

येत्या प्रशासकीय सभेत ठराव

नव्‍याने होणाऱ्या व्‍यावसायिक मिळकतींना दर्शनी भागात उच्‍च दर्जाचे सीसीटीव्‍ही बसविणे बंधनकारक करण्‍याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठीचा ठराव येत्‍या प्रशासकीय सभेत घेण्‍यात येणार असून त्‍यानंतर त्‍याबाबतच्‍या सूचना बांधकाम विभागास देण्‍यात येणार आहेत. नवीन व्‍यावसायिक प्रकल्‍पांना परवानगी देत असतानाच ही अट त्‍यात नमूद करण्‍यात येणार असून त्‍याचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()