सातारा : कोविडच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविल्याने बाधितांची संख्या आता दररोज दीडशे ते दोनशेच्या घरात जात आहे. त्यामुळे वाढलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत उपलब्ध बेड कमी पडत होते. आता खासगी रुग्णालये अधिगृहित केल्याने रुग्णांना उपचार करणे सोपे होत आहे. सुरवातीची साडेचारशे बेडची संख्या खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून आता आठशेवर गेली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली तरी त्यांना बेड कमी पडणार नाहीत.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सध्या 1599 रुग्ण विविध रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. आता संशयित व निकट सहवासीत रुग्णांच्या तपासणीचे प्रमाण आरोग्य विभागाने वाढविले आहे. पूर्वी शंभरच्या आतच चाचण्या होत होत्या. आता 400 ते 500 संशयित रुग्णांच्या तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. आता समूह संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन कडक केले होते. पण, तरीही संसर्ग वाढतच आहे. साखळी तोडण्यासाठी काही ठराविक भागच प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला जात आहे. पण, कोरोनाच्या तपासणीची संख्या वाढल्याने दररोज दीडशे ते दोनशेपर्यंत रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे वाढलेल्या रुग्णांवर त्यांच्या लक्षणानुसार उपचार केले जात आहेत.
गंभीर व अन्य काही आजार असलेल्या रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. तर ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, त्यांना इतर रुग्णालयांसह काही खासगी रुग्णालयांत ठेवले जात आहे. तसेच सौम्य तसेच कोणतीच लक्षणे नसलेल्या रुग्णांवर मात्र कोरोना केअर सेंटरमध्येच उपचार केले जात आहेत.
मध्यंतरी केवळ 450 बेडचीच जिल्ह्यात सोय होती. परंतु, आता प्रत्येक तालुक्यातील खासगी रुग्णालये अधिगृहित केल्यामुळे गंभीर तसेच अन्य आजार असलेल्या रुग्णांवर त्या त्या तालुक्यांतील अधिगृहित खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले जात आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात 800 ते 1000 बेड उपलब्ध असल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगितले जात आहे. परिणामी बेडविना कोणताही कोरोनाबाधित रुग्ण वंचित राहणार नाही. पण, काही सौम्य व लक्षणेविरहित रुग्ण खासगी रुग्णालयातच उपचारासाठी आग्रह धरत आहेत. अशा रुग्णांना खासगी रुग्णालयांत पाठविण्याऐवजी तो बेड एखाद्या गंभीर रुग्णासाठी वापरता येऊ शकणार आहे. त्यामुळे अशा सौम्य व लक्षणेविरहित रुग्णांनी कोरोना केअर सेंटरमध्येच उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
कोरोना चाचणीची संख्या वाढल्याने जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. पण, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. या वाढलेल्या चाचण्यांमुळे बाधित रुग्ण समजून येऊन त्यांना तातडीने उपचार देता येत आहेत. तसेच तालुकानिहाय खासगी रुग्णालयेही अधिगृहित केलेली असल्याने बाधित गंभीर व इतर आजार असलेल्या रुग्णांनाही बेड उपलब्ध होण्यात कोणतीही अडचण सध्यातरी नाही.
- डॉ. अमोद गडीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा
सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णस्थिती (ता. 30 जुलै रोजी सायंकाळी सहापर्यंत)
- आतापर्यंत नमुने घेतलेल्यांची संख्या- 27,346
- आतापर्यंत एकूण बाधित- 3,667
- उपचार सुरू असलेले बाधित- 1,599
- कोरोनामुक्त झालेले रुग्ण- 1,933
- मृत्यू झालेले रुग्ण- 129
(संपादन ः पांडूरंग बर्गे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.