कोरोनाचा "हॉरर शो'; नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा नाहीच

man
man
Updated on

गोंदवले (जि. सातारा) : गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेला कोरोनाचा "हॉरर शो' अजूनही सगळीकडे "हाउसफुल्ल' सुरू आहे. त्याचा परिणाम गोंदवले खुर्दमधील नाट्य परंपरेवरदेखील झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नाट्य स्पर्धेची तिसरी घंटा वाजलीच नाही. त्यामुळे 75 वर्षांची नाट्य स्पर्धेची परंपरा खंडित झाल्याने नाट्यप्रेमी, कलाकार व ग्रामस्थांची निराशा झाली आहे. 

महात्मा गांधींच्या हत्येनंतर 1948 मध्ये गोंदवले खुर्दमध्ये (ता. माण) आश्रयासाठी आलेल्या प्राथमिक शिक्षक हणमंत कुलकर्णी यांनी नाट्यकलेच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधनाला सुरवात केली होती. त्यांना साथ देत गावातील आकाराम कदम, दादा शेडगे, सीताराम कुलकर्णी, महालिंग खांडेकर, शंकरराव काळे, रामचंद्र पोळ आदी नाट्यप्रेमींनी सन्मित्र नाट्य संस्था काढली. तेव्हापासूनच गोंदवल्यात नाट्य महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कालांतराने हणमंत कुलकर्णी यांच्या निवृत्तीने खंडित झालेला उपक्रम कृष्णराव पोळ, अशोक पोळ, काशिनाथ चव्हाण, काशिनाथ जाधव यांनी 1974 मध्ये पुन्हा सुरू केला. याचदरम्यान कामगारांनी पुकारलेल्या बंदमुळे मुंबईतील कामगार गावी आले आणि नाट्यकलेच्या उपक्रमाला मूर्त रूप मिळाले. महादेव घाडगे यांच्या पुढाकाराने 1977 मध्ये सन्मित्र नाट्य संस्थेची कायदेशीर नोंदणी झाली अन्‌ अर्जुनराव शेडगे, साहेबराव शेडगे, मधुकर गुरव, रमेश खांडेकर, विजय चव्हाण, विजय ढालपे, आनंदराव पोळ, रामभाऊ पोळ यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागात पहिल्यांदाच राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा सुरू झाल्या. 

गोकुळाष्टमीला दरवर्षी गावात सुरू झालेली नाट्यस्पर्धेची परंपरा नाट्यप्रेमी व ग्रामस्थांनी गेल्या वर्षीपर्यंत सुरू ठेवली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाने कहर केला असल्याचा परिणाम या नाट्यस्पर्धेवरही झाला आहे. गेल्या सत्तरहून अधिक वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेला यंदा खंड पडला. त्यामुळे कालाकारांसह नाट्यप्रेमी प्रेक्षक व ग्रामस्थांचीही निराशा झाली आहे. 


यंदा नाट्यस्पर्धेची परंपरा खंडित झाल्याने मन नाराज झाले आहे. परंतु, पुढच्या वर्षी सर्वांच्या सहकार्याने त्याच जोमाने पुन्हा या स्पर्धा व कार्यक्रमाचे नेटके नियोजन करून गोकुळाष्टमी साजरी करू. 

- रमेश खांडेकर, नाट्यकर्मी, गोंदवले खुर्द 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.