Satara : गुन्हेगारांकडूनच पोलिसांच्या कार्यक्षमतेला आव्हान

गुन्हेगारी नियंत्रणासाठी अपुऱ्या बळामुळे अडचणी
Police
Policeesakal
Updated on

कऱ्हाड : रस्त्यावर होणाऱ्या मारामाऱ्या थेट पोलिस चौक्यांसमोरही होत आहेत. मागील आठवड्यात सहा वेगवेगळ्या घटनांत झालेल्या चाकू हल्ल्यात तीन घटना पोलिस चौक्यांच्या आसपासच घडल्या. त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचे बळ अपुरे पडल्याचे दिसते. मेन रोड, कृष्णा घाट व विद्यानगर पोलिस चौक्यांबाहेरील जीवघेण्या घटना पोलिसांच्या कार्यक्षमतेलाच आव्हान देताहेत. शहरात जीवघेणे हल्ले होत असताना त्या पोलिस चौक्या मात्र ओस पडताना दिसताहेत.

शहरातील कृष्णा घाट पोलिस चौकी म्हणजे असून अडचण नसून खोळंबा झाला आहे. गाजत वाजत उद्‍घाटन झालेल्या कृष्णा घाट पोलिस चौकीत पोलिसच नसतात, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. तेथे पालिकेने नेमलेल्या सुरक्षा रक्षकांच्या जिवावर साराच कारभार असतो. तेथेही दोनच सुरक्षा रक्षक आहेत. अशा वेळी काही अवचित घटना झाल्यास पोलिस उपलब्ध नसतात, अशा तक्रारी पालिकेतही झाल्या आहेत. सुरक्षा रक्षकांच्या मर्यादा व पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे तेथे गोंगाट करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

वाहतुकीचा बोजवारा ठरलेलाच आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांवर पोलिसच ताव मारताना दिसतात. काही वेळा लागे बांधे जपणाऱ्या पोलिसांच्या भूमिका मात्र त्या भागासाठी धोकादायक ठरल्या आहेत. पोलिस चौकीत अनेक दिवसांपासून पोलिसच नाही. त्यामुळे ती पोलिस चौकी कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. नागरिकांच्या तक्रारींचा ढीग वाढत असतानाही कृष्णा घाटावर पोलिस काहीच उपाय करताना दिसत नाहीत. त्यासोबत मेन रोड पोलिस चौकीचीही हीच ओरड दिसते. वास्तविक, त्या पोलिस चौकीत भटक्या कुत्र्यांचा वावर दिसतो. त्याची चर्चा समाज माध्यमावरही झाल्याचे दिसते. काही वेळा कुलूप घालून पोलिस व संबंधित अधिकारी पोलिस ठाण्यात काम आहे,

असे सांगून बिनधास्त बाहेर फिरताना दिसतात. विद्यानगर पोलिस चौकीचीही हीच तऱ्हा आहे. दररोज किमान पाच हजार विद्यार्थ्यांचा तेथे राबता आहे. त्याचीही पोलिसांना जाण नसल्याचेच दिसते. त्याच भागात परवा चाकू हल्ला झाला. त्यामागेही बरीच कारणे असली तरी त्या भागातील पोलिस चौकीही ओस दिसत असल्याने शहरातून तेथे नेऊन एकावर चाकू हल्ला झाल्याचे वास्तव लपत नाही. मोठ्या गुन्हेगारांवर कारवाईसाठी पोलिसांनी मोका कायद्याची अंमलबजावणी प्रभावी केली आहे.

मात्र छोट्या- मोठ्या गुन्ह्यांसाठी पोलिसांकडे उपायच नाहीत, अशी स्थिती आहे. संघटित गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी सात टोळ्यांवर झालेल्या मोकाची कारवाईने ६३ गुंडांच्या मुसक्याही आवळल्या. मात्र, अद्यापही लहान- सहान गुन्ह्यातील पोलिसांच्या कारवाईत ढिलाई दिसते आहे. कऱ्हाडच्या गुंडगिरीवर मोकाची सर्वाधिक कारवाई झाली खरी मात्र छोट्या-छोट्या गुन्ह्यांकडे होणारे दुर्लक्ष शहराच्या शांततेला बाधा ठरत आहे. त्यावर ठोस उपायांची गरज आहे.

...अशी आहे स्थिती

लोकवस्तीतील चौकीत

पोलिसांचीच वानवा

गस्त घालणारे पोलिसही सुस्त

बीट मार्शलची संकल्पनाही तोकडी

चौकी उघडी तर पोलिस गायब

पेट्रोलिंगही पडतय त्रोटक

गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांच्या समावेशाचीही पोलिसांना नाही जाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.