सातारा : आडसालीचे वाढलेले क्षेत्र जिल्ह्यातील साखर कारखान्यांची डोकेदुखी ठरली आहे. सध्या गाळप हंगाम मध्यावर आला आहे. यावर्षी काही कारखान्यांनी क्षमता वाढविल्यामुळे एप्रिलपर्यंत हंगाम आटोपण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी मिळून ६३ लाख ८९ हजार मेट्रिन टन उसाचे गाळप करून ६३ लाख ३३ हजार क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सरासरी ९.९१ टक्के साखर उतारा मिळाला आहे. जरंडेश्वर व कृष्णा कारखान्याने गाळपात, तर साखर उताऱ्यात सह्याद्री साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे.
जिल्ह्यात खासगी सात व सहकारी आठ असे १५ कारखान्यांचे गाळप सुरू आहे. यावर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यावर्षी बहुतांशी कारखान्यांनी आपली क्षमता वाढविल्याने गाळपाचा वेग चांगला आहे. त्यामुळे बऱ्यापैकी ऊस तुटला आहे.
वेळेत ऊस तुटावा, यासाठी शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवडीवर भर दिला आहे. परिणामी आडसालीचे क्षेत्र वाढलेल्याने हा ऊस सर्वप्रथम गाळपासाठी आणावा लागत आहे. त्यामुळे सुरू व पूर्व हंगामी ऊस तोडण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या उसाला उशीर होत आहे.
उशीर झालेल्या उसाच्या तोडणीसाठी तोडणी टोळ्यांकडून जादा पैशांची मागणी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.
जिल्ह्यातील खासगी कारखान्यांनी आतापर्यंत ३७ लाख ९१ हजार, २९७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३४ लाख ६७ हजार ७५५ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.
सरासरी साखर उतारा ९.१५ टक्के मिळाला आहे. सहकारी कारखान्यांनी २५ लाख ९८ हजार ६०६ मेट्रिक टन उसाचे गाळप करत २८ लाख ६५ हजार ४७० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. या कारखान्यांचा सरासरी उतारा ११.०३ टक्के आहे.
खासगी कारखान्यांमध्ये जरंडेश्वर कारखान्याने गाळपात आघाडी घेतल्याचे दिसून येते. त्यांनी आतापर्यंत ११ लाख ५१ हजार २० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ११ लाख ५८ हजार ७०० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.
सहकारी कारखान्यात कृष्णा कारखान्याने सहा लाख तीन हजार २८० मेट्रिक टन उसाचे गाळप करत सहा लाख १४ हजार ४७० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. साखर उताऱ्यात सह्याद्री कारखाना आघाडीवर असून, त्यांना ११.८१ टक्के साखर उतारा मिळाला आहे. खासगीत खटाव-माण ॲग्रो प्रोसेसिंग युनिटला १०.९५ टक्के साखर उतारा मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.