सातारा : अपुरे संख्याबळ व चक्राकार ड्युट्यांचा अभाव यामुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोकळ्या मनाने कुटुंबामध्ये मिसळता येत नाही. त्यातच कोरोना रुग्णांच्या सततच्या संपर्कामुळे येणाऱ्या तणावामुळे त्यांची मानसिकता बिघडत आहे. कोरोना लढ्यातील या मुख्य सैनिकांना सक्षम ठेवण्यासाठी रुग्णालय प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने साडेपाचशेचा टप्पा ओलांडला आहे. लॉकडाउनच्या दोन महिन्यांच्या कालावधीत धोका कमी होईल, असे मानले जात होते. परंतु, लॉकडाउन अनलॉकिंग सुरू झाले तरी, कोरोनाबाधितांची संख्या कमी व्हायचे नाव घेत नाही. उलट सुरवातीच्या टपप्प्यात एक-दोन रुग्ण सापडले तरी, खूप काही झाल्यासारखे वाटायचे. मात्र, आता दिवसाला 20 ते 40 रुणांची भर पडत आहे. जिल्ह्यांतर्गत बहुतांश निर्बंध मुक्त झाल्यामुळे आगामी काळात हा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना लढ्यामध्ये सर्वात महत्त्वाचे सैनिक
असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवरचा ताण आणखी वाढणार आहे.
जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी कोरोना रुग्णांच्या सेवेत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याने त्यांना चक्राकार पद्धतीने कोरोना ड्युटी देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यामध्ये कोरोना वॉर्डमध्ये सात दिवसांची ड्युटी दिली जाते. सात दिवस संपल्यानंतर त्यांना सात दिवस क्वारंटाइन राहावे लागते. क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर त्यांना नॉन कोरोना वॉर्डमध्ये ड्युटी दिली जाते. कोरोना वॉर्डमध्ये ड्युटीला असल्यानंतर एक प्रकारे मानसिक ताण असतोच. अशा परिस्थितीत कुटुंबाजवळही मोकळेपणे जाता येत नाही. त्यामुळे तो ताणही हलका होत नाही. त्यासाठीचे कामाचे असे नियोजन केलेले आहे. त्यामुळे किमान नॉन कोरोना ड्युटीमध्ये त्यांना कुटुंबीयासोबत खुल्या मनाने राहता येते.
जिल्हा रुग्णालयामध्ये परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने चक्राकार नेमणुका दिल्या आहेत. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याबाबतीत या पद्धतीची अंमलबजावणी केली गेली नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये पुरुषांबरोबर महिलाही त्याच ताकदीने कार्यरत आहेत. वास्तविक कुटुंबाची जबाबदारी, मुले असूनही त्या या जबाबदारी सांभाळत आहेत. सातत्याने कोरोना ड्युटीत असल्यामुळे त्यांनाही आपल्या घराकडे पूर्ण क्षमेतने वेळ देता येत नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पथके बनवून त्यांना चक्राकार पद्धतीने कोरोना ड्युटीची जबाबदारी देणे अत्यावश्यक बनले आहे. तरच सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांची कोरोनाविरुद्ध लढ्याची मानसिकता व बळ टिकून राहू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.