फलटणमध्ये नगरपालिकेची सहा महिने मासिक सभाच नाही

patan
patan
Updated on

फलटण शहर (जि. सातारा) : फलटण शहरात कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात ठेवण्यासाठी पालिका प्रशासन व्यस्त आहे. या दरम्यान गेल्या सहा महिन्यांत फलटण नगरपालिकेची एकही मासिक सभा न झाल्याने शहरातील विकासकामांना खीळ बसली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तरी नगरपालिकेची सभा होणे अपेक्षित होते, असा सूर नगरसेवकांसह नागरिकांमधून उमटत आहे. 

फलटण पालिकेची शेवटची मासिक सर्वसाधारण सभा मार्च महिन्यात झाली होती. नगराध्यक्षांनी दरमहा मासिक सर्वसाधारण सभा बोलावणे हे बंधनकारक असते. मात्र, कोरोनामुळे ही सभा घेता आली नाही. याबाबत राज्य सरकारकडून कोणतेही निर्देश आलेले नव्हते. परंतु, नगरविकास विभागाकडून पालिकेची मासिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याबाबतच्या सूचना आल्या आहेत. त्याबाबतचे प्रशिक्षणही नगरसेवकांना देण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आपापल्या प्रभागातील प्रश्‍न सोडवण्यासाठी निदान आता तरी ऑनलाइन सभा त्वरित घ्या, असा सूर नगरसेवकांमधून उमटत आहे. 

नगरपालिकेच्या मालकीची रुग्णवाहिला व शववाहिका घेण्याबाबतच्या प्रस्तावावर मासिक सर्वसाधारण सभेची मोहर उमटल्याशिवाय पुढे कार्यवाही करता येत नाही. कोरोनाच्या काळामध्ये रुग्णवाहिका ही अत्यावश्‍यक आहे. कोरोना नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या कोरोना योद्‌ध्यांच्या प्रोत्साहनपर भत्त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठीही मासिक सभेची आवश्‍यकता आहे. असे अनेक विषय प्रलंबित राहिल्याने नगराध्यक्षांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मासिक सर्वसाधारण सभा तातडीने बोलावणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 


शासनाने दिलेल्या निर्देशानुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लवकरच मिटिंग आयोजित करण्यात येणार आहे. ऑनलाइन मिटिंगबाबत सर्व नगरसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. एक डेमो मिटिंगही झाली आहे. 
- नीता नेवसे, नगराध्यक्षा, फलटण 


मासिक सर्वसाधारण सभा बोलावण्याचा अधिकार नगराध्यक्षांचा आहे. शासनाच्या नियमानुसार दरमहा मासिक सभा बोलावणे गरजेचे असते. तीन आठवड्यांपूर्वी नगरविकास विभागाने मासिक सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लवकरच सभा घेतली जाईल. 
- प्रसाद काटकर, मुख्याधिकारी, फलटण 


फलटणमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गत सहा महिन्यांमध्ये सत्ताधारी व प्रशासनाने कोरोनाबाबत नक्की कोणत्या उपाययोजना केल्या व कोणत्या करणे गरजेचे आहे, याबाबत नगरसेवकांना विश्‍वासात घेतलेले नाही. नगरसेवकांचा आवाज दाबण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत कलहामुळे विकासकामे प्रलंबित आहेत. 

- समशेरसिंह नाईक-निंबाळकर, विरोधी पक्षनेते, फलटण 

संपादन ः संजय साळुंखे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.