कोयनानगर (जि. सातारा) ः गेल्या वर्षी कोयना धरणातून नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे प्रचंड हानी झाल्याच्या जखमा अजून ओल्या आहेत. कोयना धरणात सध्या पाण्याचा सुकाळ असला, तरी धरणाचे व्यवस्थापन बघणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दुष्काळ आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कोयनेत प्रभावी पूरनियंत्रण होत नसल्याने आपत्ती व्यवस्थापनावरच आपत्ती कोसळण्याची चिन्हे आहेत.
राज्यात वेळेआधीच मॉन्सून बरसणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. मॉन्सून तोंडावर असताना राज्यातील जनतेचे लक्ष मात्र कोयना धरणाकडे लागले आहे. कोयना धरणात 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. धरणातील पाणी वाटपाचा आर्थिक वर्ष एक जून ते 31 मे असे असते. धरणातून पश्चिमेकडील वीज प्रकल्पांसाठी 67.50 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी 25.11 टीएमसी असा पाण्याचा वापर झाला आहे. धरणात सध्या 34.37 टीएमसी पाणीसाठा आहे. केंद्रीय जल आयोगाच्या नियमानुसार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरणात दहा टक्के पाणीसाठा बंधनकारक आहे. मात्र, कोयनेत त्याचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे स्पष्ट होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोयना धरणाची पाहणी करून जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन व पूरनियंत्रणाचा आढावा घेणार आहेत. कोरोनाच्या संकटामुळे अद्याप त्यांची कोयना धरणास भेट देणे शक्य झाले नाही. त्यामुळे जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन अद्याप तरी कागदावरच आहे.
या धरणात सध्या पाण्याचा सुकाळ असला, तरी धरणाचे व्यवस्थापन बघणाऱ्या कोयना धरण व्यवस्थापनात मनुष्यबळाचा दुष्काळ आहे. धरण व्यवस्थापनात केवळ तीन उपअभियंता, तर चार शाखा अभियंता कार्यरत आहेत. कोयना धरण व्यवस्थापनाचे प्रमुख कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांची 22 मार्चला बदली झाली आहे. त्यांच्या जागी दूध गंगा कालवे क्रमांक एकच्या कार्यकारी अभियंता शिल्पा मुगदूम यांची नियुक्ती झाली आहे. कोयना प्रकल्पात गेल्या वर्षी झालेल्या महापुरामुळे खांदेपालट झाला आहे. कोयनेत झालेल्या खांदेपालटामुळे कोयनेत मॉन्सूनपूर्व कामे केली नाहीत.
राज्य शासनाचे दुर्लक्ष....
गेल्या वर्षी कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पश्चिम महाराष्ट्रावर महापुराचे संकट ओढवले होते. यावर्षी मात्र शासनाच्या दुर्लक्षपणामुळे कोयना धरणच संकटात आल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.