शाळा बंद असताना विद्यार्थी 'शिष्यवृत्ती'ला कसे सामोरे जाणार?; पालकांत परीक्षेबाबत अनास्था

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

मायणी (जि. सातारा) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्याबरोबर कडक निर्बंधातही वाढ होतेय. लॉकडाउनची टांगती तलवार आहे. त्यातच शाळा बंद असताना पाचवी व आठवीचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला कसे सामोरे जाणार? या चिंतेत असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेबाबत पालकांमध्ये अनास्था दिसून येत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांची नावनोंदणी करण्यास पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार टाळण्याच्या उद्देशाने गतवर्षीच्या मार्चपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या. नोव्हेंबरअखेरीस इयत्ता नववीपासून पुढचे वर्ग सुरू करण्यात आहे. जानेवारीअखेरीस पाचवी ते आठवीचे वर्ग भरविण्यास सुरुवात झाली, तर चौथीपर्यंतचे वर्ग अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. दरम्यान, दोन मार्चपासून पुन्हा इयत्ता नववीपर्यंतचे वर्ग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे रुळावर येण्यापूर्वीच पाचवी ते नववीपर्यंतच्या वर्गांची गाडी घसरली. प्रदीर्घ काळ विद्यार्थी शाळेपासून दूर राहिल्याने शाळा, शिक्षक आदी सर्व घटकांबाबत अनास्था निर्माण झाली आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांकडे आवश्‍यक व पुरेशी तांत्रिक सुविधा नसल्याने ऑनलाइन शिक्षणाचे केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत आहेत. प्रत्यक्षात दहा-वीस टक्केच विद्यार्थ्यांचा ऑनलाइनसाठी प्रतिसाद मिळत असल्याचे वास्तव आहे.

शिक्षण विभागाने 25 टक्के अभ्यासक्रम कमी केला असला तरी प्रत्येक वर्गाचा नियोजित अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. तसेच तो चांगल्या प्रकारे पूर्ण करणे अशक्‍य असल्याचे शिक्षक खासगीत बोलत आहेत. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील प्रत्यक्ष आंतरक्रिया पुरेशा प्रमाणात घडत नसल्याने विद्यार्थी व शिक्षकही अस्वस्थ आहेत. अशा विचित्र परिस्थितीत शिष्यवृत्ती परीक्षा कशी होणार? विद्यार्थी परीक्षेला कसे सामोरे जाणार? कोरोनामुळे परीक्षा तरी होणार का? परीक्षा ऑफलाइन होणार की ऑनलाईन? अशा प्रश्नांनी पालक अस्वस्थ आहेत. त्याचाच परिणाम म्हणून परीक्षेसाठी नावनोंदणी करण्यास पालक इच्छुक नसल्याचे दिसत आहे. त्याशिवाय यंदा शंभर, पन्नास टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसवणे अनिवार्य असल्याचे फर्मानही शिक्षण विभागाने काढलेले नाही. 

कोरोनामुळे यंदा शिष्यवृत्ती परीक्षेस विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद फारच कमी आहे. 

- दत्तात्रय शिंदे, शिक्षक 

शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिकवलेले मुलांना समजत नाही. अभ्यास नसताना नुसते परीक्षेला बसवून उपयोग नाही. 

- सोमनाथ घाडगे, पालक 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.