Satara : किसन वीर’ची मोळी पवारांच्‍या हस्‍ते टाकणार

आमदार मकरंद पाटील; कारखान्‍याचा बॉयलर प्रदीपन, ऊस तोडीत राजकारण येणार नाही
Satara
Satarasakal
Updated on

वाई : दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी सभासदांनी आपला ऊस कारखान्याला द्यावा. ऊस तोडीत राजकारण येणार नाही. शासनाच्या एफआरपीप्रमाणे ऊस बिलाचे पैसे देणार आहोत. त्यामुळे पैशाची चिंता करू नका. शरद पवार, अजित पवार आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांचे मार्गदर्शन असल्याने सरकार असले आणि नसले तरी काही फरक पडणार नाही, असा विश्‍‍वास किसन वीर कारखान्‍याचे अध्‍यक्ष आमदार मकरंद पाटील यांनी व्‍यक्‍त केला. येत्या ७ नोव्‍हेंबरला (सोमवार) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते मोळी टाकून चालू गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

आमदार पाटील यांच्‍या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याच्या सन २०२२-२३ या गळीत हंगामासाठी बॉयलर प्रदीपन आमदार पाटील आणि त्याच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चनाताई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रीमती सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, नितीन भरगुडे-पाटील, बाळासाहेब सोळस्कर, मनोज पवार, ॲड. शामराव गाढवे, दत्तानाना ढमाळ, वसंतराव मानकुमरे, बाबासाहेब कदम, प्रतापराव पवार, शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, राजेंद्र राजपुरे, पै. विक्रांत डोंगरे, सत्यजित वीर, शिवाजी जमदाडे, महादेव मस्कर, अनिल सावंत, हणमंत चवरे यांची उपस्थिती होती.

श्री. पाटील म्हणाले, ‘मागील काही वर्षांत अनागोंदी व चुकीच्या व्यवस्थापनाने कारखान्यावर कर्जाचा मोठा बोजा करून ठेवला आहे. त्यामुळे आज कोणतीच बँक एक छदाम देऊ शकत नाही. त्यासाठी भागभांडवलात वाढ करण्याशिवाय पर्याय नाही. आतापर्यंत २७ कोटींचे भांडवल जमा झाले असून अजून ४० ते ५० कोटी जमा करावे लागणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक भागभांडवल जमा करून सहकार्य करावे.’

दरम्‍यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व सेवा सदन लाइफलाइन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संसुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यास उत्‍स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ३०० जणांनी रक्तदान केले. १२०० जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यापैकी ७० जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मिरज येथे करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान सकाळी आमदार पाटील यांनी वाईच्या महागणपतीची आरती केली. यावेळी शहर व तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले.

कारखाना कर्जमुक्‍त करण्‍याचे आव्‍हान

एक हजार कोटी कर्जाचा बोजा असलेल्या किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याची आपली इच्छा नव्हती; परंतु सर्वांच्या आग्रहाखातर लोकप्रतिनिधी या नात्याने सामान्य शेतकरी व कामगारांच्या हितासाठी आमदारकी पणाला लावली. त्यामध्ये यशही आले; परंतु आता कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून कर्जमुक्त करण्याचे मोठे आव्हान आहे. यासाठी भागभांडवल वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे, असे आवाहन कारखान्याचे अध्‍यक्ष आमदार मकरंद पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.