महिला कोरोना फायटर्स'ची मानसिक छळवणूक; जिल्हा रुग्णालयात खदखद

महिला कोरोना फायटर्स'ची मानसिक छळवणूक; जिल्हा रुग्णालयात खदखद
Updated on

सातारा : कोरोना संसर्गाच्या काळात महिला असूनही या लढ्यात हिरिरीने व प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची काही सहकाऱ्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे कुचंबना होत आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयात
वाढणाऱ्या या चुकीच्या पद्धतीला वरिष्ठांकडून अंकुश लावला जात नाही. त्यामुळे सध्याच्या काळात कुटुंबाची जबाबदारी असूनही, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाबरोबरचे युद्ध लढत असलेल्या "महिला कोरोना फायटरर्स'चे मानसिक
खच्चीकरण होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका घेणे आवश्‍यक आहे. अन्यथा या खदखदीचा विस्फोट होऊ शकतो. 

जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थापनाच्या कारभारावर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारीही नाखूष असल्याचे अनेकदा समोर आलेले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी योग्य ती भूमिका घेत सर्वांना समान न्यायाने वागवावे व
आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात एवढीच सर्वांची अपेक्षा असते; परंतु त्या पूर्ण होत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतही तक्रारी गेल्या आहेत. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांना दिलासा मिळालेला नाही.

काल जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना लढाईत काम करणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना डॉक्‍टर्स डेच्या शुभेच्छा दिल्या; परंतु केवळ शुभेच्छा देण्यापेक्षा या वैद्यकीय अधिकाऱ्यांना होणारा त्रास  निवारण्यासाठी त्यांनी योग्य ती भूमिका घेणे आवश्‍यक होते, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे; परंतु त्यांच्याकडूनही वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समाधान होईल, अशी कृती झालेली दिसत नाही. त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची खदखद व्यक्त करणारी एक ऑडिओ क्‍लिप नुकतीच बाहेर आली. त्यातून कारभारात काही तरी अडचण नक्कीच आहे हे तरी स्पष्ट होत आहे. मात्र, व्यक्त न होणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तोंड दाबून बुक्‍यांचा मार सहन करावा लागत आहे. त्यामध्ये महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची अधिकच कुचंबना होत आहे. 

महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांपेक्षा घरची जबाबदारी जास्त असते. लहान मुले घरातील, ज्येष्ठांना सांभाळावे लागते, तरीही कोरोनाच्या या काळात कोणतेही कारणे पुढे न करता त्यांनी आजवर लढा दिलेला आहे. अनेकांनी आजारी असूनही आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले.  कुटुंबाला वेळ देता यावा, यासाठी त्यांनी कामाचे चक्राकार पद्धतीने नियोजन करावे, अशी मागणी अनेकदा केली; परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. त्यातच कोरोनाच्या काळात कामावरून गैरहजर असणाऱ्यांबाबतही व्यवस्थापनाने कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही. काही पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी व्यवस्थापनाकडून दुजाभाव केला जात असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्याबाबत तक्रारी करूनही वरिष्ठांकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे त्यांचा मुजोरपणा आणखी वाढून काम करणाऱ्यांना कसा त्रास देता येईल, असा त्यांचा प्रयत्न होतो. त्यामुळे विशेषत: महिला
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.