सातारा : साहित्य परंपरा समृद्ध करणारे जगन्नाथ शिंदे

साहित्यिक जगन्नाथ शिंदे हे जावळी तालुक्यातील काटवली गावचे
जगन्नाथ शिंदे
जगन्नाथ शिंदेsakal
Updated on

सातारा जिल्ह्याच्या समृद्ध, संपन्न साहित्य परंपरेतील महत्त्वपूर्ण नाव म्हणजे जगन्नाथ शिंदे. आठवीत शिकताना लिहिलेली पहिली एकांकिका अन् नववीत असताना लिहिलेली पहिली कादंबरी ही त्यांच्या साहित्यिक प्रतिभेची साक्ष. अविरत, अव्याहतपणे सुरू असलेला त्यांचा हा प्रवास लवकरच १५० साहित्यकृतींच्या घरात पोचतो आहे.

- सुनील शेडगे

सा हित्यिक जगन्नाथ शिंदे हे जावळी तालुक्यातील काटवली गावचे. पूर्वाश्रमीचे ते प्राथमिक शिक्षक. राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी होण्याचा सर्वोच्च क्षण त्यांच्या आयुष्याने पाहिले. शिक्षणाबरोबरच साहित्यिक प्रांतातही ते तितक्याच आत्मियतेने रमले. अभिनयकलेशीही समरस झाले. (कै.) गणपतराव बेलोशे यांनी गावात नाट्यकला रूजवली. त्यातूनच प्रेरणा घेत जगन्नाथ शिंदे हे बालवयापासूनच अभिनय अन् लेखनाशी जोडले गेले.

सातवीत शिकत असताना पु. ल. देशपांडे यांच्या ‘पुढारी पाहिजे’ या नाटकात त्यांनी भूमिका केली. आठवीत असताना त्यांनी पहिली एकांकिका लिहिली. पुढे नववीत त्यांनी चक्क कादंबरी लेखन केले. आज हा प्रवास पन्नास कादंबऱ्या, पन्नास नाटके यासह एकांकिका, ललितकृती मिळून दीडशे संख्येच्या वाटेवर आहे.

जगन्नाथ शिंदे यांनी चौफेर लेखन केले आहे. विविध विषयांच्या परिघांना त्यांनी स्पर्श केला आहे. अर्थात, ग्रामीण जीवन, तिथली संस्कृती, मानवी व्यवहार हे त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. ‘फटाकडी’सारख्या त्यांच्या लोकनाट्यांना रसिकांनी डोक्यावर घेतले. नरराक्षस या वगनाट्याला लोकमान्यता लाभली. अग्निपथ या कौटुंबिक नाटकाला तब्बल अकरा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. त्यांच्या राजकीय नाटकांनीही रसिकांना भुरळ घातली. त्यांच्या नाटकांतील सामाजिक विषय हे नेहमीच रसिकमान्य ठरले. अनेक पुस्तकांना नवनव्या आवृत्त्या पाहण्याचे भाग्य लाभले. विविध दैनिके, साप्ताहिके, मासिके अन् नियतकालिकांतून आजवर त्यांच्या हजारभर कथा प्रकाशित झाल्या आहेत.

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डिंश, अॅक्सीलन्स अॅवॉर्ड, फ्रेंडशिप अॅवॉर्ड, शनैश्वर, राष्ट्रीय एकात्मता, शिवछत्रपती मराठा भूषण, जावळी तालुका नाट्य गौरव, शुभचिंतक पाचगणी यांसारख्या पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झाला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ, शिक्षण संशोधन मंडळ, बालचित्रवाणी, प्रौढ शिक्षण संस्था, सातारा आकाशवाणी, साहित्य संस्कृती मंडळ अशा विविध संस्थांतूनही त्यांनी काम केले आहे.

मान्यवरांचे सहकार्य महत्त्वपूर्ण...

जगन्नाथ शिंदे यांना गणपतराव बेलोशे यांच्याकडून मोलाची प्रेरणा लाभली. बंधू सखाराम, तुकाराम, पत्नी कुसूम यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. परमपूज्य नंदगिरी महाराज, संपत बेलोशे, धनराज जगताप, नानासाहेब कासुर्डे, सुरेश शिंदे, बबन शिंदे यासारख्यांचे या प्रवासात महत्त्वपूर्ण सहकार्य लाभल्याचे ते नमूद करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.