सातारा, कऱ्हाड, महाबळेश्वरसह 'या' पालिकांसाठी लवकरच 'रणधुमाळी'

‘एक वॉर्ड, एक उमेदवार’ पद्धतीने होणार निवडणूक; वॉर्ड रचनेचे आदेश
Election Commission
Election Commissionesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : जिल्ह्यातील नगरपालिकांच्या यंदाच्‍या निवडणुका (Satara Municipal Election) एक वॉर्ड पद्धतीने होणार असून, त्‍या पद्धतीनेच राज्‍य निवडणूक आयोगाने आज वॉर्ड रचनेचे आदेश दिले. या आदेशानुसार सोमवारपासून (ता. २३) जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, रहिमतपूर, म्हसवड या पालिकांच्‍या हद्दीतील वॉर्ड निश्‍चितीची प्रकिया सुरू होत आहे. यंदाची निवडणूक ‘एक वॉर्ड, एक उमेदवार’ (One Ward, One Candidate) या पद्धतीने होणार असल्‍याने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

Summary

जिल्ह्यातील नगरपालिकांच्या यंदाच्‍या निवडणुका (Satara Municipal Election) एक वॉर्ड पद्धतीने होणार आहे.

जिल्ह्यातील पालिकांची निवडणूक गेल्या वेळी बहुसदस्‍यीय पद्धतीनुसार झाली होती. यंदाची निवडणूक मात्र ‘एक वॉर्ड, एक उमेदवार’ पद्धतीने घेण्‍याचा निर्णय निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केला होता. अपेक्षेनुसार राज्‍य निवडणूक आयोगाने नोव्‍हेंबरमध्‍ये कालमर्यादा संपणाऱ्या नगरपालिका व नगरपंचायतींच्‍या हद्दीतील वॉर्ड निश्‍चितीचा प्रारूप आराखडा तयार करण्‍याचे आदेश स्‍थानिक प्रशासनास दिले. नव्‍याने होणाऱ्या वॉर्ड रचनेसाठी २०११ मधील लोकसंख्‍या गृहीत धरण्‍यात येणार असून, आयोगाच्‍या आदेशानुसार लोकसंख्या, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या व प्रगण गटाचे नकाशे उपलब्ध ग्राह्य धरावे लागणार आहेत.

त्याचबरोबर वॉर्ड दिशा, सरासरी लोकसंख्येनुसार वॉर्ड संख्‍या ठरविण्याचेही आदेशात नमूद आहे. अंतिम वॉर्ड रचना मंजूर करून प्रसिद्धी देण्‍यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल. वॉर्ड रचना ही मुख्याधिकारी करणार असून, प्रारूप मान्यता व त्याच्या हरकती, त्यात बदल, सूचनेनंतर अंतिम वॉर्ड रचनेला मंजुरी हे जिल्हाधिकारी देतील. प्रत्येक पालिकास्‍तरावर हे काम सोमवारपासून (ता. २३) सुरू होणार असून, प्रारूप तयार झाल्‍यानंतर त्‍याची माहिती प्रसारित करण्‍यात येणार आहे. यंदाच्‍या निवडणुकीची वॉर्ड निश्‍चितीसाठी नऊ टप्‍पे तयार करण्‍यात आले आहेत.

त्यात गत वॉर्ड रचना, गत आरक्षणे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा वॉर्ड रचना, वॉर्ड रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे, नागरिकांच्या मागास प्रवर्गासह महिला आरक्षणाची सोडत काढणे, प्रारूप वॉर्ड रचना जाहीर करणे, त्यावर हरकती व सूचनांची सुनावणी घेणे, त्यानंतर अंतिम वॉर्ड रचना जाहीर प्रसिद्ध करावे आदींचा समावेश आहे. दरम्यान, ‘एक वॉर्ड, एक उमेदवार’ त्यानुसार इच्‍छुकांनी साखरपेरणी सुरू केली होती. वॉर्डाचा आडाखा बांधत इच्‍छुकांनी शक्तिप्रदर्शन, जनसंपर्कावर भर दिल्‍याने गेल्‍या काही दिवसांपासून सातारा, कऱ्हाड तसेच इतर पालिकांच्‍या भागात चुरस निर्माण झाली. शक्तिप्रदर्शन करत जनसंपर्कावर जोर देणाऱ्या इच्‍छुकांच्‍या नजरा वॉर्ड निश्‍चितीकडे लागल्‍या होत्‍या. सातारा आणि कऱ्हाड या दोन पालिका आणि त्या ठिकाणचे राजकारण जिल्ह्यात नेहमीच चर्चेचा विषय असतो. आयोगाने दिलेल्‍या आदेशामुळे या दोन ठिकाणचे राजकारण पुन्‍हा एकदा उफाळून येणार आहे.

राज्यातील १५९ पालिकांचा समावेश

एप्रिल- मेमध्ये मुदत संपलेल्या व पोटनिवडणुका लागलेल्या पालिकांच्या निवडणुका पुढे जातील, असा अंदाज होता. मात्र, या आदेशामुळे पुन्हा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुदत संपलेल्या चारसह पोटनिवडणुका लागलेल्या ४० पालिकांच्या निवडणुकांना ब्रेक देऊन तेथे प्रशासक नेमले आहेत. कोरोना कालावधी संपल्यानंतर निवडणुका होणार असून, तोपर्यंत प्रशासकाची नियुक्ती होणार होती. नोव्हेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील आठसह राज्यातील १५९ पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ते वातावरणही आता नव्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. त्याबाबत दै. ‘सकाळ’नेही सिंगल वॉर्ड रचनेसंदर्भात ३० डिसेंबरच्या अंकात बातमी छापली होती. तोही अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.

अशी होईल वॉर्ड रचना...

  • गुगल अर्थ मॅपिंगद्वारे वॉर्ड रचना होणार

  • वॉर्डातील वस्त्यांचे विभाजन न होण्याचे घेणार दक्षता

  • अनुसूचित जाती व जमातीच्या वस्त्यांचे विभाजन न करता वॉर्ड रचना

  • वॉर्डातील नागरिकांचे दळणवळण वॉर्ड रचना करताना विचारात घेणार

  • वॉर्ड रचना करताना प्रगणक गट फोडण्याची शक्यता कामी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.