गोंदवले (जि. सातारा) : ना नात्याची ना गोत्याची; पण केवळ माणुसकीतून खाकी वर्दी धावली अन् उपचारानंतर "त्या' सुद्धा चालू लागल्या. अधू झालेल्या वृद्ध महिलेसाठी खाकी वर्दीतील चांगणची मदत "अमोल' ठरली. या घटनेने शिखर शिंगणापुरात पुन्हा एकदा पोलिसातील देवमाणूस पाहायला मिळाला.
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या शिखर शिंगणापुरात श्री शंभू महादेवाच्या भक्त म्हणून यमुनाबाई कलावंत राहतात. अगदी लहानपणापासूनच त्यांचे येथे वास्तव्य आहे. मात्र, त्या कोण, कुठल्या याची काहीच माहिती कुणाला नाही. इथे त्यांचे कुणी नात्यागोत्यातील कधी दिसलेच नाहीत. दिवसभर महादेवाची आराधना करणाऱ्या यमुनाबाई या सध्या सत्तरीत पोचल्या आहेत. त्यामुळे आता मिळेल त्यात समाधान मानूनच त्यांचा जीवनप्रवास सुरू आहे. निराधार असल्या तरी शिंगणापूरकरच आता त्यांचा आधार बनलेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी यमुनाबाई या पायरीवरून घसरल्या अन् खुबा मोडल्याने अधू झाल्या. ही बाब त्या सांगणार तरी कोणाला? त्यामुळे काही दिवसांपासून जागेवरच खिळून राहिल्या. बरेच दिवस न दिसल्याने नेहमीच्या संपर्कातील लोकांच्या नजरेतून ही गोष्ट लपून राहिली नाही.
येथील सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे यांनी अखेर यमुनाबाईंना गाठले अन् सारा प्रकार लक्षात आला. अधू झालेल्या यमुनाबाईंवर तत्काळ उपचार करण्याची गरज होती. ही बाब त्यांनी दहिवडी पोलिस ठाण्यातील कर्मचारी अमोल चांगण यांच्या कानावर घालताच वर्दीतील देवमाणूस मदतीला धावून आला. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने श्री. चांगण यांनी त्यांना लगेच फलटण येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांच्या दवाखान्यात दाखल केले. खुबा मोडल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार होती; पण कोणतेही आढेवेढे न घेता चांगण यांनी शस्त्रक्रियेसाठीची आर्थिक तजवीजही केली. डॉ. जोशी यांनीही त्यांना हातभार लावला. अखेर खुब्याचे यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आले अन् यमुनाबाई पुन्हा चालण्यासाठी सज्ज झाल्या.
माझ्या उपचारासाठी पोलिसाच्या रूपाने शंभू महादेवच धावून आला. माझी शंभू सेवा सार्थक झाल्याचे समाधान आहे.- यमुनाबाई कलावंत, शिखर शिंगणापूर
शंभू महादेवाचा भक्त असल्याने यमुनाबाईंच्या सेवेतून ही माझी ईश्वरसेवाच झाली आहे, असे मी समजतो.- अमोल चांगण, पोलिस कर्मचारी, शिखर शिंगणापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.