ढेबेवाडी : कुत्र्याचा पाठलाग करत भरवस्तीत घुसलेला बिबट्या व त्याच्या बछड्यांनी दोन शेळ्यांसह एका बोकडाचा बळी घेतल्याची घटना काल रात्री उशिरा भोसगाव (ता.पाटण) येथील थोरातवस्तीत घडली. शिवारात दिसणारा बिबट्या अगदी घराजवळ पोचल्याने भोसगावकरांची झोपच उडाली आहे. वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
काल रात्री अडीचच्या सुमारास भक्ष्याच्या शोधार्थ भोसगावात आलेल्या बिबट्याने राजेंद्र देशमुख यांच्या कुत्र्याचा पाठलाग केल्याने जीव वाचविण्यासाठी कुत्रे घराकडे धावले, घराच्या बंद दरवाजावर कुत्र्याने धडक दिल्यावर त्याच्या आवाजाने श्री.देशमुख यांना जाग आली. त्यांनी घराबाहेर येऊन पाहिल्यावर घाबरलेले कुत्रे दृष्टीस पडले. त्यानंतर थोड्याच वेळात जवळच्याच थोरात वस्तीत घुसलेल्या बिबट्या व बछड्याने तेथील छाया वसंत थोरात यांच्या घराजवळच्या जनावरांच्या शेडात घुसून दोन शेळ्या व एका बोकडाचा बळी घेतला.
गळ्यास बांधलेली नॉयलॉनची दोरी न तुटल्याने मृत शेळी व बोकडाला तेथेच सोडून बिबट्या तेथीलच अन्य एका गाभण शेळीला फरफटत घेऊन शिवारात पळून गेला. शेळीचा आरडाओरडा ऐकून शेडकडे धावलेल्या थोरात कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्या परिसरात रात्री उशिरापर्यंत माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. पाटण पंचायत समितीचे उपसभापती प्रतापराव देसाई, वनपाल सुभाष राऊत, जयवंत बेंद्रे, नथुराम थोरात, अजय कुंभार,अनिकेत पाटील, विनोद थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून ग्रामस्थांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या. उपजीविकेचा आधार असलेल्या शेळ्या व बोकडाचा बिबट्याने बळी घेतल्याने थोरात कुटुंबीयांसमोर बिकट प्रश्न उभा राहिला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.