लोणंद (जि. सातारा) : खंडाळा तालुक्यात कोरोनाच्या संकटातही वाळूमाफियांनी उच्छाद मांडला आहे. त्यात पाडळी गाव हॉटस्पॉट ठरले आहे. महसूल आणि पोलिस यंत्रणेला ठेंगा दाखवत कंटेनमेंट झोनमुळे लॉकडाउन असलेल्या पाडळीतून रात्रीच्या वेळी रस्त्यात आडवे बांधलेले कळक व लोखंडी रेलिंग सोडून वाळूचोर गाड्या नेत आहेत. दरम्यान, कोरोनामुळे आलेली ही आपत्ती वाळू माफियांच्या दृष्टीने आपत्ती नव्हे, तर इष्टापत्ती ठरत असल्याची बाब समोर आली आहे.
आमदार मकरंद पाटील यांनी गुरुवारी (ता. 28) खंडाळा तालुक्यामधील कंटेनमेंट झोनमधील गावांना भेटी देऊन गावांचा आढावा घेतला. त्या वेळी पाडळीतील ग्रामस्थांशी चर्चा करताना ग्रामस्थ या नात्याने शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे यांनी पाडळी गाव लॉकडाउन असतानाही रात्रीच्या वेळी वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याचा प्रश्न उपस्थित केला. याबाबत तहसीलदार दशरथ काळे यांच्याशी चार वेळा मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही, अशी तक्रार श्री. घाडगे यांनी आमदार श्री. पाटील यांच्याकडे केली. त्या वेळी तहसीलदार श्री. काळे यांनी पुढे होत याबाबत ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे सांगितले. त्या वेळी आमदार श्री. पाटील त्यांनी याबाबत महसूल व पोलिस यंत्रणेने तातडीने लक्ष घालण्याची सूचना केली. त्या वेळी ही बाब समोर आली.
खंडाळा तालुक्यात गेल्या काही वर्षांत नदीकाठच्या अथवा डोंगर पायथ्यांच्या गावात लहानमोठ्या वाळूमाफियांचे पेव फुटले आहे. वाळूतून आलेल्या पैशातून गळयात व हातात सोन्याचे गंडे घालून फिरणाऱ्यांकडे पाहून अनेक जण दहावी- बारावीनंतरच कोणता व्यवसाय करायचा तर वाळूचा, असेच "फॅड' येथील तरुण पिढीत वाढल्याचे चित्र आहे. यामध्ये बोटावर मोजण्याएवढे स्थिरावले. मात्र, बहुतांश युवक लयास गेल्याचे चित्र आहे. कमी वेळात व कमी कष्टात हाती आलेल्या पैशाचा वापर अनेक जण विविध व्यसनांसाठी उडवून व्यसनाधीन होऊन नको त्या गोष्टींच्या नादी लागले आहेत.
टॅक्टर, डंपर, जेसीबी यासारखी वाहने खरेदीसाठी बॅंकाकडून काढलेली कर्ज फेडण्यासाठी वेळप्रसंगी हे महाभाग वाडवडिलांची जमीन फुंकण्यास मागेपुढे पाहात नाहीत. परिणामी घराघरांत, भावकीत वादविवाद वाढले आहेत. त्यातून गावची शांतताही भंग पावली आहे. गावच्या ओढ्या- नाल्यांतून होणाऱ्या बेसुमार वाळू उपशांमुळे गावच्या जमिनीतील पाण्याची पातळीही कमालीची खालावली आहे. निसर्गचित्रच बदलून गेले आहे. अनेक गावांत 300 ते 500 फुटांपर्यंत बोअर खोदूनही पाण्याचा थेंब लागत नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. ओढ्या नाल्यातील वाळू संपुष्टात आल्याने अनेक वाळूमाफियांनी आता शेतातील वाळू उपशाकडे मोर्चा वळवलेला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वाळू आहे, त्याला थोडेबहुत पैसे देऊन रात्रंदिवस वाळू उपसून शेतीही उकरली जाऊ लागली आहेत. परिणामी शेत शिवरांचाही चेहरा विद्रुप होऊ लागला आहे. पाडळीत आशाच एका शेतातून वाळू उपसली जात असल्याची बाब श्री. घाडगे यांनी आमदारांसह सर्वांसमोर पुढे आणली.
प्रशासकीय अधिकारी झारीतले शुक्राचार्य!
हे चित्र केवळ पाडळी गावापुरतेच नाही तर तालुक्यांतील बहुतांशी गावात पाहायला मिळते. झारीतले शुक्राचार्य असलेले प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी मात्र सोयीनुसार याला खतपाणी घालून अथवा तोंडदेखले केव्हातरी कुठेतरी जुजबी कारवाईचा बडगा उगरून चोखपणे काम करत असल्याचा आव आणतात. कोण बिघडले? कोणाचे काय नुकसान झाले? याचे या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कसलेच सोयरसुतक नसते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.