Satara Lok Sabha 2024:
कऱ्हाड: महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला असेल तर त्यांनी त्यांची तयारी करावी. आमची तर तयारी झालीच आहे. लोकांच्या मनात काय आहे? हे लोकं ठरवतील. बऱ्याचशा गोष्टी आज बोलण्यापेक्षा लवकरच त्या उघडकीस येतील, असे सुचक इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता आज येथे दिला.
मतदार संघाच्या संपर्क दौऱ्यादरम्यान खासदार भोसले यांनी आज कऱ्हाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यादरम्यान ते बोलत होते. सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, भरत पाटील, विक्रम पावसकर, एकनाथ बागडी, पैलवान धनाजी पाटील, सुनिल काटकर आदी उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, लोकसभेचा उमेदवार म्हणूनच मी संवाद साधत आहे. भाजप निश्चीतपणे निर्णय घेईल. काही अडचणी असतात. सातारा हा नेहमी राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू असतो. या सातारा जिल्ह्याने केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. लहान लग्नाच्या याद्या करणे सोपे असते. हे मोठं लग्न आहे.
महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केला असेल तर त्यावर मी चर्चा करणे योग्य होणार नाही. पण एखाद्या माणसाचे कॅरेक्टर बघायचे असेल तर त्यांनी १५-२० वर्षाच्या कालावधीत संबंधित माणसाची वैयक्तीक वाटचाल कशी झाली आहे, हे पहावे. त्यातुन तुम्हाला त्यांच्याकडून समाजसेवा किती घडली आणि काय घडली ? हे समजेल. नावं ठेवणे हे मी कधी करत नाही. बऱ्याचशा गोष्टी आज बोलण्यापेक्षा लवकरच त्या उघडकीस येतील, असेही सुचक वक्तव्य त्यांनी केले.
काँग्रेसच्या नेत्यांवर हल्लाबोल-
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा हा ग्रेसचा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या योजना ग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या काळात का राबवल्या नाहीत असा सवाल उपस्थित करुन ते म्हणाले, मी कृष्णा खोरे विकास महामंडळाचा प्रकल्प मंजूर केल्याने दुष्काळी भागाला पाणी मिळाले. जसा विश्वास निर्माण झाला तसा ठिकठिकाणी परिवर्तन झालेले पहायला मिळत आहे.
काँग्रेसच्या काळात एवढा उतमात झाला होता की मला त्याचे नवल वाटायचे. काँग्रेसवाले दगडाला शेंदुर जरी फासला तरी लोक निवडून देतील असे म्हणत होते. काँग्रेसच्या ज्या नेत्याने भाजप हा जातीयवादी पक्षाचा खासदार होऊ देणार नाही, असे विधान केले असेल त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या काळात कृष्णा खोरे सारखा प्रकल्प का राबवला नाही हे जाहीर करावे.
शाहू महाराजांच्या उमेदवारीचे स्वागतच-
खासदार भोसले म्हणाले, कोल्हापुरच्या शाहु महाराजांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिल्याबद्दल मी त्याचे स्वागतच करतो. मला लवकर उमेदवारी दिली नाही यात वाईट मानायचे काहीच कारण नाही. ही लोकशाही आहे. लोकशाहीत थोडं पुढे-मागे होते. ज्यावेळेस चर्चा होते. त्या चर्चेतुनच काहीतरी चांगल घडत असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.