महाबळेश्वर : येथे १०० कोटी विकासाच्या नावाखाली पर्यावरणदृष्ट्या शहरात केवळ कॉँक्रिटीकरण सुरू आहे. त्यामुळे ‘एक ना धड...’ अशा पद्धतीने कोणतेही नियोजन न करता सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांत संताप आहे.
नियोजन नाही, देखरेखीसाठी वास्तुविशारद अथवा पालिकेचा तज्ज्ञ अभियंताही पूर्ण वेळ नाही. त्यामुळे हेरिटेजला धरून किंवा पर्यावरणाला साजेसे काम होताना दिसत नाही. त्यामुळे १०० कोटींच्या कामामुळे महाबळेश्वरचे रूप पालटेल असे दिसत नाही. त्याउलट भविष्यात अडचणीत वाढ होईल, असे दिसून येते.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून महाबळेश्वर शहराच्या विकासासाठी आलेल्या १०० कोटींच्या शहर सुशोभीकरणाचे काम येथे सुरू आहे. येथील मुख्य पेटिट लायब्ररीपासून सुरू झालेल्या कामाचा प्रारंभ त्यानंतर होत असलेल्या मशिद रस्त्यावरील कामे पाहता शहरातील नागरिक समाधानी नाहीत. केवळ विकासासाठी आलेला निधी परत जाऊ नये, काम थांबू नये, या हेतूनेच नागरिक गप्प आहेत. अनेकदा तक्रारी करून ही कामाच्या पद्धतीत कोणतीच सुधारणा होताना दिसत नाही. ठेकेदार व अधिकाऱ्यांकडून केवळ खोटी आश्वासने मिळत असल्याने नागरिकांत नाराजी आहे.
शहराच्या सुशोभीकरणासाठी १०० कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. त्याचे काम येथे संथगतीने सुरू आहे. प्रथम पेटीट लायब्ररी या हेरिटेज वास्तूचे सुशोभीकरण सुरू केले. अनेक त्रुटींमध्ये हे काम सुरू असताना या हेरिटेज वास्तूमधील जुने हेरिटेज साहित्याची निगा राखण्याची खबरदारी ठेकेदाराने घेतलेली दिसत नाही. येथील संबंधित हेरिटेज साहित्य मैदानावर उघड्यावरच अस्ताव्यस्त पडले आहे.
येथील ब्रिटिशकालीन लाखो रुपयांचा बिलियर्ड्स टेबलची देखरेख न करता हलगर्जीपणाने नीटही ठेवलेला दिसत आहे. नुकत्याच केलेल्या भिंतीतून पाणी वाहत असल्याचे पाहून कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तक्रारीनंतर तेवढ्यापुरते सारवासारव करून काम पुढे सुरू ठेवले जात आहे.
त्यामुळे पालथ्या घड्यावर पाणी अशीच परिस्थिती दिसून येते. काम करताना येणारे अडथळे दूर न करता काम उरकण्याची ठेकेदाराला घाई झाल्याचे दिसते. हे काम पूर्ण न करताच अचानक रात्रीमध्ये घाईगडबडीत मशिद रोडवरील काम सुरू करण्यात आले. रस्ता उकरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले; परंतु रस्ता करण्यापूर्वी रस्त्यात फोन व लाइटच्या केबलचे काहीच नियोजन झाले नसल्याने खोदल्यानंतर घाईगडबडीत सुरू ठेवण्यात आले.
काही केबल टाकून इथेही घाईत काम सुरू ठेवले आहे. हे कामही अपूर्ण ठेऊन येथील मशिद रोडच्या पुढील ग्रामीण रुग्णालयाची भिंतीचे काम सुरू केले होते. मधेच सुमारे १० वर्षांपूर्वी बदलेल्या पाइपलाइनवर सध्या वेगळी पाण्याची पाइपलाइन पुन्हा टाकण्यात येत आहे. पाइप टाकताना पाण्याचा प्रवाह त्याचा जमिनीखाली किती फूट असावी? याबाबत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होते का? हा संशोधनाचा विषय आहे.
मशिदजवळ असलेली ब्रिटिशकालीन मोरी तोडून तिथेही पूर्वीपेक्षा कमी जाडीचे पाइप टाकण्यात येत आहेत. त्यामुळे भविष्यात पाणी रस्त्यावरून वाहून रस्त्याचे नुकसान होणार आहे. अनेक ठिकाणी लाइटची केबल टाकताना केलेल्या घाईमुळे तर काही ठिकाणी केबल टाकायची वाट न बघता रस्ता तयार करणे अशा पद्धतीत कामे उरकण्याची ठेकेदार व प्रशासनाला घाई झाली आहे का? असा प्रश्न आहे. गटारे देखील सिमेंट कॉँक्रिटची करताना अनेक ठिकाणी पाण्याच्या पाइप मिळकतीमध्ये कसे नेणार? याचे कोणतेही नियोजन दिसून येत नाही.
येथील म्हम्मादेवीच्या मंदिराच्या गल्लीतून आलेल्या पाण्याच्या पाईपची गळती न काढता काम उरकण्यात आले आहे. त्यामुळे तेथे रोज पाणी वाया जात आहे. त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सुरवातीला गटारेही काढली नव्हती;
परंतु नागरिकांनी आवाज उठवल्यावर नव्याने गटारे काढली. गटारे काढतानाही उताराचा विचार केलेला नाही. त्यामुळे गटारांमध्ये पाणी साचून अनेक ठिकाणी डास व रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. कामाची पद्धत, नियोजन व गतीबाबत आक्षेप नोंदवून संतप्त नागरिकांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतल्यानंतर ठेकेदार व अधिकाऱ्यांची
उन्हाळी हंगाम अडचणीचा...
काम व्यवस्थित नियोजनपूर्वक सुरू ठेवण्यास नागरिकांचे त्यास सहकार्य राहील. त्यासाठी वास्तू विशारद, पालिका अथवा शासनाच्या पूर्णवेळ तज्ज्ञ अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा महाबळेश्वर शहराचे मोठे नुकसान होणार आहे. उन्हाळी हंगामात मशिद रोड सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, कामाच्या पद्धतीवरून कामाचे नियोजन व्यवस्थित न केल्याने उन्हाळी हंगामात अडचणी निर्माण होण्याच्या भीतीने, तसेच मशिद रस्ता पूर्ण झाल्यानंतरच अन्य कामांना सुरुवात करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.