वाई (जि. सातारा) : तालुक्यात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून, अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे. आज पहाटेच्या सुमारास मांढरदेव घाटात मोठी दरड कोसळली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, मोठाले दगड रस्त्यावर आल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
तालुक्यात गेल्या 24 तासांत सरासरी 12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, आजअखेर एकूण 500.69 मिलिमीटर पाऊस झाला आहे. बलकवडी धरण परिसरात मागील 24 तासांत 45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत एकूण 1,464 मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात 1436 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून, धरणाची पाणीपातळी 810.30 मीटर, तर पाणीसाठा 3.53 टीएमसी आहे. धरण 86.05 टक्के भरले आहे. धोम धरण परिसरात 13 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, एकूण 550 मिलिमीटर पाऊस झाला आहे. पाणलोट क्षेत्रातून धरणात 2726 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून, धरणाची पाणीपातळी 741.97 मीटर तर पाणीसाठा 7.45 टीएमसी आहे. धरण 63.78 टक्के भरले आहे.
दरम्यान, आज पहाटे मांढरदेव घाटात कोचळेवाडी गावाच्या हद्दीत मोठी दरड कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, मांढरदेव येथून औद्योगिक वसाहतीत कामाला येणारे चाकरमानी व दूध विक्रेते आदींची वाहने अडकून पडली होती. सकाळी साडेआठ वाजता याबाबतची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जावून जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर आलेले मोठे दगड दूर करून वाहतूक सुरळीत केली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्रीपाद जाधव यांनी दिली.
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.