कुकुडवाड (जि. सातारा) : चंदीगढ (हरियाणा) येथे झालेल्या राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेमध्ये आठ किलो मीटरचे अंतर 26 मिनिटे 40 सेकंदांत पार करून वैयक्तिक सहावा क्रमांक मिळवत महाराष्ट्र संघाला पहिला क्रमांक मिळवून देणाऱ्या उदयोन्मुख खेळाडू बाळू पुकळेची मैदानावर तसेच मैदानाबाहेर आर्थिक परिस्थितीची कसरत सुरू आहे. राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत हरियाणा व राजस्थान संघाचे तगडे आव्हान असताना बाळू पुकळे व सुशांत जेधे यांच्या दमदार कामगिरीमुळे महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवता आले.
कऱ्हाडला शालेय शिक्षणाबरोबर बाळूने क्रीडा शिक्षणाचे धडे घ्यायला सुरुवात केली. दोन वर्षे कऱ्हाडला सराव केल्यानंतर बाळू पुकळे गत तीन वर्षांपासून मांढरदेव गडावर राहून कसून सराव करतोय. गेल्या वर्षी कोरोना महामारीची परिस्थिती उद्भवल्यामुळे अनेक स्पर्धा झाल्या नाहीत, अन्यथा बाळूची कामगिरी चांगली झाली असती हे नक्की. बाळूने तीन वर्षांत चार राष्ट्रीय स्पर्धा तसेच राज्य स्पर्धेत अनेक पदके मिळवली आहेत. बाळू हा दीर्घ पल्ल्याचा खेळाडू आहे.
बाळू हा मूळचा माण तालुक्यातील पुकळेवाडी गावचा. अल्पभूधारक असलेल्या बाळूच्या वडिलांनी कऱ्हाडला कृष्णाकाठी स्थलांतर केले. कऱ्हाडमध्ये वाखानच्या शिवारात बाळूच्या वडिलांची झोपडी आहे. बाळूच्या आई-वडिलांचा वीटभट्टीवर मोलमजुरीचे काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालत होता. परंतु, अचानक वीटभट्टीवर काम करताना विटांनी भरलेला ट्रकचा फाळका निसटून विटांचा ढीग बाळूच्या वडिलांच्या अंगावर पडला. त्यात त्यांच्या आतड्यास इजा पोचून जायबंदी व्हावे लागले. मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते बचावले. पुढे त्यांना रोजंदारीवर बकरी राखण्याचे काम करण्याची वेळ आली. मोलमजुरी करून आई-वडिलांनी बाळूला पोसले व शिकवले. बाळूला प्रकाशबापू पाटील यांनी मदत केल्याचे बाळूचे आई-वडील सांगतात. 25 वर्षांहून अधिक काळ कऱ्हाडला झोपडीत राहणारे बाळूचे आई-वडील प्रथमच लॉकडाउनमध्ये दुष्काळी माणमध्ये मूळगावी आले आहेत. परंतु, मूळगावी राहायला घरही नसल्याने तिथेही त्यांची परवड सुरूच आहे.
बाळूची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. मांढरदेव ऍथलेटिक्स फाउंडेशनच्या मदतीने राजगुरू कोचळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतोय. येणाऱ्या सर्वच स्पर्धांत अव्वल दर्जाचा खेळाडू बनण्याचा मानस बाळू याने व्यक्त केला आहे. बाळूची स्वतःचा पोषण आहार आणि प्रवासासाठी लागणारा खर्च करण्याची ऐपत नाही. समाजातील दानशूर मंडळींनी पुढे येऊन बाळूला आर्थिक पाठबळ दिल्यास त्याचा खेळ बहरण्यास मदत होणार आहे. तसेच देशाचा नावलौकिकही वाढणार आहे.
Edited By : Siddharth Latkar
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.