सातारा : खासगी रुग्णालयांनी कोरोना बाधितांच्या (covid19 patient) उपचाराचे बिलिंग करतानाचा ताळतंत्र सोडला आहे. त्यामुळे पीपीई किटसाठी (ppe kit) रुग्णांच्या नातेवाईकांना 40 ते 50 हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. या अनागोंदीला रोखण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी उभारलेली बिलांची ऑडिट यंत्रणा कुचकामी ठरत आहे. त्यामुळे पीपीई किटचा भार सोसण्याशिवाय रुग्ण व नातेवाईकांसमोर पर्याय राहिलेला नाही. (satara marathi news hospitals overcharge ppekit)
जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. मोठ्या रुग्णसंख्येला आवश्यकतेनुसार शासकीय बेड उपलब्ध करून देण्यात प्रशासकीय यंत्रणा अत्यंत तोकडी पडत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव नातेवाईकांना जीव वाचविण्यासाठी रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. सुरवातीच्या टप्प्यात खासगी रुग्णालयांमध्ये अव्वाच्या सव्वा खर्च वसूल केल्याची प्रकरणे समोर आली. त्यानंतर खासगी रुग्णालयांमध्ये बाधितांची लुटमार थांबविण्यासाठी शासनाने उपाययोजना केली. त्यामध्ये कोणत्या सुविधेसाठी किती रुपये आकारायचे, याचे दरपत्रक शासनाकडून तयार करण्यात आले. त्यानंतरही बिलाची योग्य पद्धतीने आकारणी होते की नाही, हे तपासण्यासाठी खासगी रुग्णालयांतील बिलांचे ऑडिटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी रुग्णालयनिहाय ऑडिटरची नेमणूकही करण्यात आली. परंतु, या उपाययोजनेनंतरही रुग्णांच्या नातेवाईकांचे आर्थिक भुर्दंडाचे ओझे कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अनेकांकडून "रुग्ण झाला ना बरा, आता कशाला काय करता,' असे सल्ले दिले जातात. त्यामुळे 12 दिवसांच्या उपचारासाठी नातेवाईकांना दोन ते अडीच लाख रुपये मोजावे लागत आहेत.
हजारोंच्या पटीत रुग्णांची लूट
औषधे, अन्य कारणांसाठी होणाऱ्या खर्चाचे तर सोडाच. परंतु, केवळ पीपीई किटच्या खर्चापोटी दहा ते बारा दिवसांसाठी नातेवाईकांना 40 ते 50 हजार रुपये मोजावे लागत आहेत. काही रुग्णांच्या बिलांचे अवलोकन केल्यास एका रुग्णाचा 12 दिवसांसाठी औषधे व पीपीई किटचा खर्च हा 92 हजार रुपयांपर्यंत दाखविण्यात आला आहे. तर, दुसऱ्या एका रुग्णाला 12 दिवसांसाठी 63 पीपीई किट वापरल्याचे नमूद करत 600 रुपये दराने केवळ पीपीई किटचे शुल्कच 37 हजार 800 रुपये लावण्यात आले आहे. अन्य एका रुग्णाला पीपीई किटचे 12 दिवसांसाठी 50 हजार रुपयांचे बिल लावण्यात आले आहे. त्यामुळे पीपीई किटच्या ओझ्याखालीच सर्वसामान्य माणूस चिरडतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दर कमी; पण जुनीच आकारणी
शासकीय रुग्णालयांना पीपीई किट पुरवणाऱ्या हापकिन संस्थेचा चांगल्या प्रतीच्या पीपीई किटचा दर प्रति किट 180 ते 200 रुपयांदरम्यान आहे. परंतु, खासगी रुग्णालयांमध्ये एका पीपीई किटला 600 रुपये घेतले जात आहेत. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यानंतर काही वस्तूंची निर्मिती वाढली आहे. त्यामुळे त्यांचे दरही कमी झाले आहेत. त्यामध्ये पीपीई किटचाही समावेश आहे. परंतु, दरांचा रिव्ह्यू घेऊन त्याप्रमाणे दर निश्चिती करून रुग्णांवरील ताण कमी करण्याचे काम प्रशासनाकडून झाले नाही. त्यामुळे कोरोनाग्रस्तांवर बसणारा नियमबाह्य भुर्दंड टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
शासकीय व खासगीतील वापरात तफावत
जिल्हा रुग्णालयामध्ये सर्वसाधारणपणे 190 बाधित रुग्ण उपचारासाठी दाखल असतात. या रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवसाला साधारणपणे 200 ते 300 पीपीई किट वापरले जातात. त्यामुळे साधारणपणे एका रुग्णामागे दिवसाला सुमारे दीड पीपीई किटचा खर्च येतो. परंतु, खासगी रुग्णालयांमध्ये याच पीपीई किटचा वापर प्रति रुग्ण सहा ते आठ किटपर्यंत जात आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला तपासायला किंवा नर्सिंग सेवा द्यायला स्वतंत्र पीपीई किट घातले जाताहेत की नाही, असा प्रश्न निर्माण होतो.
कोरोना बाधितांवरील उपचाराची वाजवीपेक्षा जास्त बिले आकारली जात असल्यास रुग्णांच्या नातेवाईकांनी संबंधित रुग्णालयातील ऑडिटरला भेटून शंका निरसन करावे. अयोग्य आकारणी झाली असल्यास त्यामध्ये सुधारणा होण्यासाठी ऑडिटर पुढील कारवाई करतील.
- देविदास बागल, प्रकल्प अधिकारी, महात्मा फुले जनआरोग्य योजना.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.