गृहराज्यमंत्र्यांच्या पाटण तालुक्‍यात पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी टंचाई!

Satara
Satara
Updated on

पाटण (जि. सातारा) : तीन पोलिस ठाणी व तीन पोलिस दूरक्षेत्र अशी यंत्रणा तालुक्‍याची कायदा व सुव्यवस्था पाहण्यासाठी आहे. मात्र, यंत्रणेत अधिकाऱ्यांसह पोलिसांची मंजूर पदांपेक्षा रिक्त पदे अधिक असल्याने पोलिसांवर कामाचा ताण पाहावयास मिळतो. येथील पोलिस ठाण्याचा पोलिस निरीक्षकपदाचा कारभार गेली अनेक वर्षे सहायक पोलिस निरीक्षकावर चालला आहे. त्यांचीच बदली होऊन दीड महिन्याचा काळ लोटला तरी गृहराज्यमंत्र्यांच्या तालुक्‍याला अद्याप अधिकारी मिळालेला नाही. ही शोकांतिका कधी संपणार? असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

पाटण, कोयनानगर व ढेबेवाडी येथे पोलिस ठाणे, तर पाटणअंतर्गत मल्हारपेठ व कऱ्हाड तालुक्‍यातील उंब्रज पोलिस ठाण्यांतर्गत तालुक्‍यातील चाफळ व तारळे दूरक्षेत्राचा कारभार चालतो. पाटण पोलिस ठाणे व मल्हारपेठ दूरक्षेत्रासाठी दोन अधिकारी व 47 कर्मचारी पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या एक अधिकारी प्रभारी आणि सात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कोयना विभागातील शिरळपासून विहेपर्यंत, तर मोरणा विभागातील पांढरेपाणीपासून वनकुसवडेपर्यंत आणि गिरेवाडीपासून जरेवाडीपर्यंतच्या गावांचा कारभार पाटण पोलिस ठाण्यामार्फत चालतो. 

ढेबेवाडीत मंजूर पदांपेक्षा जास्त पदे कार्यरत आहेत. एक अधिकारी व 21 कर्मचारी मंजूर असून सध्या दोन अधिकारी आणि 30 कर्मचारी कार्यरत दिसतात. साधारणपणे दोन जिल्हा परिषद गटांपेक्षा कमी कार्यक्षेत्र असताना पदांचा आकडा मात्र जास्त दिसतो. त्याउलट कोयनानगरला एक अधिकारी 
व 37 कर्मचारी पदे मंजूर असली तरी कर्मचाऱ्यांची 18 पदे रिक्त आहेत. कऱ्हाड तालुक्‍यातील उंब्रज पोलिस ठाण्यांतर्गत चाफळ व तारळे दूरक्षेत्र येते. उंब्रजला एक अधिकारी व सहा कर्मचारी पदे रिक्त आहेत. त्याचा एकूण परिणाम चाफळ व तारळ्याच्या कामकाजावर होतो. कोयनानगरला कोयना प्रकल्पामुळे कायम वर्दळ असते. संपूर्ण कार्यक्षत्र दुर्गम असल्याने भ्रमण दूरध्वनीचाही संपर्क काही गावात होत नाही. घाटमाथा ते शिरळ व पाथरपुंज ते डिचोली अशा दुर्गम भागात कर्मचाऱ्यांची दमछाक होते. 

पाटणला सर्व शासकीय कार्यालये, बाजारपेठ, शाळा, महाविद्यालयांची संख्या जास्त असताना रिक्त पदांमुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायम ताण असतो. पाटणला पोलिस निरीक्षक पद मंजूर आहे. मात्र, विकास धस यांची बदली झाल्यानंतर आजपर्यंत सहायक पोलिस निरीक्षकावर जबाबदारी आहे. त्यातच सहायक पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांचीही बदली झाल्यानंतर गेला दीड महिना कोयनानगरकडे प्रभारी कार्यभार आहे. तालुक्‍याचे विद्यमान आमदार शंभूराज देसाई हे राज्याच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री असताना त्यांना एक पोलिस अधिकारी मिळू नये, ही शोकांतिका म्हणावी लागेल. 

पाटणचे पोलिस निरीक्षकपद भरा 

गेली अनेक वर्षे पाटण पोलिस ठाण्याला पोलिस निरीक्षकाचा कारभार सहायक पोलिस निरीक्षकावर चालला आहे. त्यात दोन वेळा महिलाराजचाही अनुभव तालुक्‍याला घ्यायला मिळाला. शंभूराज देसाई यांनी तालुक्‍याचे आमदार व राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणून तालुक्‍यात एकमेव असणारे 
पोलिस निरीक्षकपद भरावे, अशी जनतेतून आग्रही मागणी होत आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.