Satara : टेलरची लेक बनली मोटार वाहन निरीक्षक

मूळच्या पाटण तालुक्यातील गलमेवाडी गावचे
मोटार वाहन निरीक्षक तेजस्विनी चोरगें
मोटार वाहन निरीक्षक तेजस्विनी चोरगेंsakal
Updated on

ढेबेवाडी : टेलरिंगचा व्यवसाय करणारे वडील आणि साड्यांना पिकोफॉल करून संसाराला हातभार लावणारी आई... अशा परिस्थितीत मोठी अधिकारी बनण्याचं स्वप्न बघणारी लेक प्राप्त परिस्थितीला आपली कमजोरी न बनू देता आई-वडिलांच्या प्रोत्साहनाने इंजिनिअर तर बनलीच. त्याही पुढे जाऊन कोणताही क्लास न लावता स्पर्धा परीक्षेतून यश मिळवत सहायक मोटार वाहन निरीक्षकपदालाही गवसणी घालत खडतर वाटेवरचा प्रवास हा जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशस्वी करून दाखवला.

मूळच्या पाटण तालुक्यातील गलमेवाडी गावचे; पण अनेक वर्षांपासून तळमावले येथे स्थायिक असलेल्या भरत व सौ. सुनीता चोरगे यांच्या जिद्दी लेकीची म्हणजे पिंपरी चिंचवडच्या सहायक मोटार वाहन निरीक्षक तेजस्विनी चोरगेंची ही कहाणी, परिस्थितीचे रडगाणे गात ध्येयापासून विचलित होणाऱ्या अनेकांसाठी दीपस्तंभ ठरावी, अशीच आहे. सर्वसामान्य चोरगे कुटुंबातील तेजस्विनी लहानपणापासूनच अत्यंत हुशार.

वडील भरत यांनी व्यवसायाच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी गाव सोडले आणि तळमावले येथे टेलरिंग व्यवसाय सुरू केला. पुढे हे कुटुंबच तळमावल्यात स्थायिक झाले. भरत यांच्या सोबत संसाराला हातभार म्हणून पत्नी सौ. सुनीता या सुद्धा साड्यांना पिकोफॉल करू लागल्या. रेडिमेड कपड्यांचे दुकानही त्यांनी सुरू केले. चोरगे दांपत्याची दोन्ही मुले तेजस्विनी आणि शुभम अत्यंत हुशार. मोठ्या तेजस्विनीने तर पहिलीपासूनच वर्गात पहिला किंवा दुसरा नंबर सोडला नाही.

मोठी झाल्यावर अधिकारी बनायचे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन तेजस्विनीने वाटचाल सुरू ठेवली होती. तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तळमावले येथे झाले. मॅकेनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा कऱ्हाड येथील शासकीय महाविद्यालयात, तर पुणे येथे अभियांत्रिकी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. २०१७-१८ मध्ये एमपीएससी परीक्षेत तिने उज्ज्वल यश संपादन केले. कोणताही क्लास न लावता स्वयंअध्ययनावर विशेष लक्ष केंद्रित करून तिने हे यश प्राप्त केल्याने त्याला एक वेगळी आणि विशेष उल्लेखनीय किनार होती.

या यशानंतर काही वर्षे तिचे जॉइनिंग रखडले. मात्र, यश उशाला आहे म्हणून गप्प न राहता त्यांनी एका कंपनीत नोकरी स्वीकारून आई वडील आणि बंधूला हातभार दिला. २०२१ मध्ये त्यांची पिंपरी चिंचवडच्या सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी नियुक्ती झाली. स्वप्न पाहणे सोपे असते. मात्र, प्राप्त परिस्थितीशी दोन हात करत ती प्रत्यक्षात आणणे ही सहज साध्य बाब नसते. तेजस्विनीने जे स्वप्न पाहिले ते जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर सत्यातही आणून दाखवले. तेजस्विनी हिचा वर्षापूर्वी विवाह झाला आहे. तिचे पती वैभव हे इंजिनिअर असून, किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहेत. बहिणीच्या पावलावर पाऊल ठेऊन बंधू शुभम यांनीही इंजिनिअरिंग व एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे.

स्पर्धा परीक्षेत उतरून तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे ना, मग मोठा खर्च, शहरातील क्लासेस, किचकट अभ्यास हा सगळा बागुलबुवा तुमच्या डोक्यातून प्रथम काढून टाका. तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचे आहे, त्या क्षेत्राविषयीची समग्र माहिती तुमच्याकडे असायलाच हवी. हे झटपट मिळणारे यश नाही, त्यासाठी दररोज पुरेसा वेळ देऊन आणि कष्ट घेऊन नियमित अभ्यास करायला पाहिजे.

- तेजस्विनी चोरगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.