कोरेगावातील प्रथमेशच्या 'मुकुंद मिश्रा'ने बनवलं लाखाे नेटकऱ्यांना भावुक

Satara
Satara
Updated on

कोरेगाव (जि. सातारा) : येथील प्रथमेश युवराज बर्गे या महाविद्यालयीन युवकाच्या अभिनय कलेला जगभरातील नेटकऱ्यांनी अक्षरशः डोक्‍यावर घेतले आहे. प्रथमेशने स्वतःच लेखन-दिग्दर्शन-अभिनय केलेल्या "मुकुंद मिश्रा' या काल्पनिक पात्राच्या एकपात्री नाटिकेचा व्हिडिओ स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आणि तो प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याच्या या व्हिडिओला आतापर्यंत 15 दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 60 हजारांहून अधिक लोकांनी त्यावर कमेंट्‌स केल्या आहेत. त्याच्या फॉलोअर्सची संख्या 500 हून एक कोटीवर गेली आहे.
गुड न्यूज : पृथ्वीराज चव्हाणांमुळे महत्त्वाचा प्रश्न सुटला  

प्रथमेश मूळचा कोरेगावचा. उच्च शिक्षणासाठी तो मुंबईत आजीकडे राहतो. मुंबईच्या एस. आय. ई. एस. कॉलेजमधून त्याने अकरावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. के. सी. कॉलेजमध्ये त्याने पदवीच्या शिक्षणासाठी शास्त्र शाखेत प्रवेश घेतला. शिक्षणाबरोबर अनेक एकपात्री अभिनय, स्किट स्पर्धा तो करू लागला. त्याच्यामधील अभिनय कौशल्याची त्याला त्यातून जाणीव होऊ लागली. त्यानंतर आयएनटीमध्ये "एच बी 1203', सृजन एकांकिका स्पर्धेत "तो हरवलाय' या एकांकिकेमध्ये त्याने अभिनय केला. मल्हार फेस्टिव्हलमध्ये पथनाट्य आणि स्टेज प्लेमध्ये सहभाग घेतला. वायू, प्रवाह, शाऊट या इंटरकॉलेजिएट फेस्टिव्हमध्ये त्याने एकपात्री अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळवले. मेघा घाडगे यांची मुख्य भूमिका आणि वामा गोर यांनी दिग्दर्शित केलेल्या "घुंगरू' या लघुपटातही त्याने काम केले.

पत्रास कारण की.. हेच विसरत चाललोय आपण! 

कोविड-19 मुळे 22 मार्चदरम्यान देशभर लॉकडाउन जाहीर झाले. लॉकडाउनमध्ये काय करायचे, असा प्रश्न प्रत्येकासमोर होता. प्रत्येकाने आपापले कम्फर्ट झोन शोधून आपापले रुटिन सुरू केले. प्रथमेश त्यातील एक. त्याने सरळ आपली मातृभूमी कोरेगाव गाठले. आपली अंतिम वर्षाची परीक्षा होणार का? आपल्या भविष्यातील करिअरचे काय, असे अनेक प्रश्न प्रथमेशसमोर उभे होते. 
लॉकडाउनच्या काळात आपल्या आवडीच्या अभिनय क्षेत्रात काही केलेले नाही, ही खंत मनात कायम होती. त्यातून एकपात्री व्हिडिओ करण्याची संकल्पना त्याला सुचली. आज सोशल मिडियाच्या जमान्यामध्ये प्रामुख्याने तरुण मंडळी पोस्ट, स्टोरीज पोस्ट करून आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आभासी चित्र उभे करताना सर्रास दिसतात. मात्र, प्रत्यक्ष जेव्हा मदतीची गरज असते, तेव्हा कोणी मदतीला उभे नसते, या गोष्टीला धरून प्रथमेशने आपल्या एकपात्री अभिनयातून "मुकुंद मिश्रा' या कॉलेजवयीन मुलाचे काल्पनिक पात्र साकारले.

केवळ 12 तासांत हजारोंची मदत!, कशी आणि कशासाठी जमा झाली मदत ते वाचा..

मुकुंद मूळचा उत्तर प्रदेशचा असतो. लॉकडाउनच्या काळात त्याची जीवनशैली व मानसिक स्थिती कशा प्रकारे बदलत जाते, लॉकडाउनमुळे त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर कसा परिणाम होतो, त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर आपल्या सर्वांच्या आयुष्यात शारीरिक आरोग्याबरोबरोबर मानसिक आरोग्य किती महत्त्वाचे आहे, यावर तो आपल्या व्हिडिओतून भाष्य करतो. प्रथमेशने या एकपात्री नाटिकेच्या कथेचे लेखन-दिग्दर्शन स्वतः केले असले तरी त्याला त्याचे अभिनयातील गुरू वामा गोर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे हा व्हिडिओ अधिक प्रभावी झाला, असे प्रथमेश आवर्जून सांगतो. 


सत्य घटनांवर लिहिण्याचा आग्रह 

सहज पण विचारपूर्वक तयार करून व्हायरल केलेल्या आपल्या व्हिडिओला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे प्रथमेशही भारावून गेला आहे. व्हिडिओत त्याचा सकस अभिनय आणि लुक पाहून अनेकांनी कॉल आणि मेसेज केले आणि म्हटले आहे की, "आम्हाला हा खरा मुकुंद मिश्रा वाटला व कॅप्शन वाचून आमचा विश्वास बसला नाही की हे काल्पनिक पात्र असून, ते प्रथमेश बर्गे याने साकारले आहे. तुझ्यासारख्या अभिनेत्याची देशाला गरज आहे.' तू रोजच्या सत्य घटनांवर आधारित विषयांवर लिहित जा आणि सादर करत राहा, असेही म्हटले आहे. 


"ऑस्कर'चा सक्षीदार व्हायचंय 

आगामी काळात मला चित्रपट क्षेत्रात खूप काम करावयाचे आहे. भारताला ऑस्कर मिळवून देणाऱ्या एखाद्या चित्रपटात अभिनय किंवा स्पॉटबॉयच्या रूपाने माझा सहभाग असावा. त्या भारतीय चित्रपटाला ऑस्कर मिळताना मी तिथं उपस्थित राहून माझ्या डोळ्यांनी तो क्षण अनुभवण्याचे माझे स्वप्न असल्याचे प्रथमेश सांगतो.  




 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.