सातारा : बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या कोरोनाबाधित होण्याचा दर पाहता शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातारा पालिका हद्दीत "होम क्वारंटाइन'ची पद्धत बंद करून संबंधित व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील शाळा- महाविद्यालये ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाचा धोका रोखण्यासाठी देशभरात 23 मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना आपल्या घरातून अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना जेथे आहे, तेथेच थांबावे लागले होते. तीन लॉकडाउनमध्ये यामध्ये शिथिलता देण्यात आली नव्हती. चौथ्या लॉकडाउनची घोषणा करताना शासनाने परराज्यांत व जिल्ह्यांत जाण्यास परवानगी दिली. ऑनलाइन पास काढून नागरिकांना त्यामुळे आपल्या कामाची किंवा मूळ गावी जाता येणे सुरू झाले.
गावी जाण्याची ही सवलत त्यांच्यामुळे जिल्ह्यासाठी धोकादायक बनली आहे. आपल्या जिल्ह्याचा विचार करावयाचा झाल्यास प्रामुख्याने मुंबई व गुजरातकडून आलेले चाकरमानी पॉझिटिव्ह येण्याची संख्या मोठी आहे. गेल्या 11 दिवसांमध्ये जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत 338 ने वाढ झाली आहे, तर मृतांचा आकडा अवघ्या दोन रुग्णांवर 18 वर गेला आहे. त्यातून कोरोना संसर्गाची दाहकता लक्षात येते आहे.
या रुग्ण वाढीला काही प्रमाणात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची मानसिकताही कारणीभूत आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरणात न ठेवता होम क्वारंटाइन होण्याची सवलत दिली. ज्यांना घरामध्ये स्वतंत्र खोलीची व्यवस्था करता येत होती, त्यांना अशी परवानगी देण्यात येत होती; परंतु त्यांना कोणातही न मिसळण्याचे, घराबाहेर न पडण्याच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक होते; परंतु या नियमांचे पालन काही ठिकाणी केले गेल्याचे दिसत नाही. होम क्वारंटाइनचा शिक्का असूनही लोक घराबाहेर पडत असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्या घरातील, तसेच काही ठिकाणी बाहेरच्यांना कोरोनाची बाधा झाली.
सातारा शहरातही बाहेरच्या व्यक्तींकडून अशी बाधा झाली होती; परंतु आता शहर कोरोनामुक्त झाले आहे. यापुढे शहरात कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी बाहेरून येणाऱ्यांना होम क्वारंटाइनची सवलत न देण्याचा निर्णय करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागेल, असा नियम केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा तयार करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. त्यासाठी शहरातील शाळा आणि महाविद्यालयांचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे साताऱ्यात बाहेरून येणाऱ्यांना आता संस्थात्मक विलगीकरणातच राहावे लागणार आहे.
""होम क्वारंटाइनच्या नियमांचे नागरिकांकडून काटेकोर पालन होत नाही. त्यामुळे सातारकरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी साताऱ्यात येणाऱ्या प्रत्येकाला संस्थात्मक विलगीकरण केंद्रात राहावे लागले, यासाठी यंत्रणा उभी करत आहोत. सर्व पदाधिकारी व नगरसेवकांच्या माध्यमातून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.''
- माधवी कदम, नगराध्यक्षा, सातारा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.