या पर्यटनस्थळी निसर्ग खुलला; पण पर्यटकांविना सुना-सुना

jawali
jawali
Updated on

पाचगणी : या परिसरात कधी ऊन... कधी पाऊस... कधी धुक्‍याचे साम्राज्य... निसर्गाच्या विविध छटांची मुक्तहस्ते उधळण होऊ लागली आहे. सभोवतालच्या डोंगररांगा हिरवळीच्या शृंगाराने सजल्या असून वर्षा ऋतूचा मनसोक्त आनंद घेण्याकरिता दाखल होणाऱ्या पर्यटकांना कोरोनाने जरी जखडून ठेवले असले आपलं रुपडं बदलण्यात निसर्ग काही थांबला नाही. निसर्गाच्या सुन्या-सुन्या मैफिलीत वाटा मात्र सुन्या-सुन्या आहेत. 

उन्हाच्या तीव्रतेने सुवर्ण रंग परिधान केलेले तण बाजूला करून, अनेक ठिकाणी वणव्यामुळे ओसाड झालेल्या डोंगररांगा आता सततच्या पावसामुळे हिरवळीच्या लेण्याने सजल्या आहेत. पाण्यासाठी आसुसलेली धरती आता पाणी पिऊन जणू तृप्त झाली असून हिरवळीवर पडलेले पाण्याचे थेंब पारदर्शक मोत्याप्रमाणे दिसतात. सारा परिसर येणाऱ्या पर्यटकांना मोहित करत आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभी पाठ फिरवलेल्या वरूणराजाने गेल्या काही दिवसांपासून हजेरी लावली असून कधी रिमझिम तर कधी हलक्‍या सरी, तर कधी मुसळधार बरसणाऱ्या जलधारांत, धुक्‍याच्या साम्राज्यात गुलाबी थंडी पडत आहे. दूरवर पसरलेल्या डोंगररांगा, कड्याकपारीतून पिंजलेल्या कापसाप्रमाणे अवतीर्ण होणारे ढंगाचे थवे, डोंगररांगातून गुंफलेल्या वेणीप्रमाणे उतरणारे पाणी, दूरवर असलेल्या भिलार वॉटरफॉलचे फेसाळलेले तुषारांना दुर्बिणीत न्याहाळताना जणू त्यांना स्पर्श करत असल्याचा आनंद घेताना हौशी पर्यटक दिसत आहेत. 

पुस्तकाचे गाव भिलार हे सुद्धा पर्यटकांविना ओस झाले आहे. उन्हाळी हंगामातील थंड हवेच्या या ठिकाणची खासियत असलेल्या स्ट्रॉबेरीची जागा आता मक्‍याच्या कणसांनी घेतली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने मार्चपासून शहरी भागातील पर्यटक येथे फिरकलाच नाही. त्यात निवासी शाळा पूर्णतः बंद झाल्याने पालकांची व पाल्यांची वर्दळ ठप्प झाल्याने येथील पर्यटक व निवासी शाळांवर अवलंबून असणारे जनजीवन मात्र आर्थिकदृष्ट्या गारठून गेले आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.