सातारा : साताऱ्याच्या जिव्हाळ्याच्या कास धरण उंची वाढवण्याच्या कामास सुधारित प्रशासकीय मंजुरीनुसार नगरविकास विभागाकडून आज सातारा नगरपरिषदेला एकूण 57 कोटींपैकी 25 कोटी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मिळाले असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे.
उदयनराजे म्हणाले, काही दिवसांपूर्वी शिंदे यांची भेट घेऊन प्रस्ताव दिला. त्याला आज यश मिळाले असून कास धरणासह इतर अनेक विकासकामांबाबत निर्णय घेण्याबाबतही विनंती प्रस्ताव दिले होते. त्यानुसार सातारकरांच्या वापराच्या पाण्याची गरज आणि पिण्याच्या पाण्याची तहान भागवणा-या कास तलावाची उंची वाढवण्याच्या निर्णय आम्ही घेतला आणि अनेक अडथळ्यांवर नियमानुसार मार्ग काढत कासच्या कामास गेल्या वर्षा-दिड वर्षापासून सुरुवात करण्यात आली. या योजनेच्या सुधारित प्रशासकीय मंजुरीसुध्दा डिसेंबर 2020 मध्ये मिळवण्यात आली. तसेच पूर्ण झालेल्या कामांची आवश्यक असणारी उपयोगिता प्रमाणपत्रे वेळच्या वेळी सादर करण्यात आली होती.
याबाबत गेल्या 15-20 दिवसापूर्वीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेवून कासधरण उंची वाढवण्याच्या सुधारित मंजुरीनुसार नगरविकास विभागाने निधी वितरीत करावा, अशी आग्रही मागणी मी केली होती. त्यानुसार काल 30 मार्च 2021 चे शासन निर्णयानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथ्थान अभियानांतर्गत रक्कम 57 कोटी 91 लाखांपैकी 25 कोटी रुपये सातारा नगरपरिषदेस, कास धरण उंची वाढवण्याच्या कामाकरिता प्राप्त झाले आहेत. पाणी हेच जीवन आहे, म्हणूनच पाण्याचा उपयोग तंत्रशुध्द पध्दतीने करण्यावर सातत्याने भर राहिला आहे. सन 1996-97 चे सुमारास, ग्रॅव्हीटीव्दारे, उघड्या पाटाने येणारे कासचे पाणी, बंदिस्त पाईपलाईनव्दारे आणण्यात यश मिळवलेले आहे. बंदिस्त पाईपलाईन झाल्यामुळे उन्हामुळे परक्युलेट (पाणी जमिनीत मुरणे) तसेच बाष्पीभवन, उघडे असलेले पाट फुटणे आदी प्रकारामुळे वाया जाणारे पाणी वाचवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कण्हेर धरण उद्भवामधून सातारच्या आत्ताच्या वाढीव भागासह एकूण 17+ उपनगरे, गावे यांना पाणी पुरवठा करणारी योजना मांडली असल्याचे त्यांनी सांगितले.
कास धरणाची उंची वाढवून, साठवण क्षमता वाढवून पाणीपुरवठा करता येणारी कास धरण उंची वाढवण्याचा प्रस्ताव सर्व प्रथम आम्हीच मांडला. आता कास धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरु होवून, सुमारे 70 ते 80 टक्के पूर्ण होत आले आहे. येत्या काही दिवसात उर्वरित कामे पूर्ण करण्यात आल्यावर, वाढीव हद्दीसह सातारकरांना मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा होईल आणि ती सातारकरांसाठी एक वेगळ्या जिव्हाळ्याची भेट असेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आज पुन्हा एकदानगरविकास खात्यासह अन्य खात्यातील संबंधितांना, सातारचीच नव्हे तर महाराष्ट्रातील मिळकतधारकांची तीन महिन्यांच्या घरपट्टी माफीचा निर्णयाबाबत, नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीस वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून निधी, प्रांतकार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे मंजुरीबाबत इत्यादी ठळक बाबींविषयी लवकरात-लवकर योग्य ती कार्यवाही होण्याविषयीही स्मरण करुन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.