सातारा (जि. सातारा) : येरळवाडी (ता. खटाव) तलावाप्रमाणेच कुमठे-मापारवाडी (ता. सातारा) तलावाही दुर्मिळ व स्थलांतरित ब्लॅक स्टोर्क (कृष्णबलक) पक्ष्यांचे आश्रयस्थान बनला आहे. सध्या या ठिकाणी कृष्णबलकच्या 12 जोड्यांचे आगमन झाले आहे. मायणी, येरळवाडी हे तलाव पक्षीप्रेमींसाठी पर्वणी ठरत असतानाच कुमठे तलाव हा देखील आता दुर्मिळ आणि स्थलांतरित "कृष्णबलक'चे आश्रयस्थान बनला आहे. मागील तीन वर्षांपूर्वी येथे "कृष्णबलक'चे दर्शन येथे झाले होते. तीन वर्षांनी आता कुमठे तलाव परिसरात "कृष्णबलक'चे आगमन झाले आहे. हे पक्षी अत्यंत लाजाळू असल्याने माणसांपासून दूर राहतात. त्यामुळे त्यांचे दर्शन होणेही कठीण असते; पण कुमठे तलाव येथे "कृष्णबलक'चेच्या 12 जोड्यांचे आगमन झाले आहे. त्यांचा येथे मुक्तवावर पाहायला मिळत आहे.
"कृष्णबलक' (Ciconia nigra) हे स्टोर्क या कुळातील असून Ciconiidae या फॅमिलीतील पक्षी आहेत. साधारण तीन ते साडेतीन फूट एवढ्या आकाराचे ते असून, त्यांना सुंदर आशा काळ्या- निळ्या फिरत्या रंगांचे पंख असतात. लालभडक चोच व पाय हे या पक्ष्याला आणखीनच सुंदर बनवतात. हे पक्षी लांब अंतर स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांपैकी आहेत. "कृष्णबलक' हे युरोपियन देशांतून तेथील बर्फवृष्टीपासून वाचण्यासाठी भारतात स्थलांतर करतात. त्यांची वीण युरोपात होत असल्याने येथे पक्षी फक्त आश्रयासाठी येतात. युरोपमधील झाडांवर त्यांचे अत्यंत मोठे घरटे वर्षानुवर्षे असते. त्यात हे दोन ते तीन अंडी देऊन पिल्लांचे संगोपन करतात. बर्फवृष्टीला सुरवात होण्यापूर्वीच नवीन पिल्लांना घेऊन हे पक्षी आशिया आणि आफ्रिका या खंडांकडे प्रवास सुरू करतात.
भारतात हे मुख्यत्वे काझीरंगा अभयारण्य, आसाम, पंजाब, कर्नाटक, तसेच श्रीलंका येथे हे पक्षी दिसून येत होते. आता साताऱ्यातील कुमठे तलाव हा देखील त्यांचे आश्रयस्थान बनत आहे. त्याचबरोबर चक्रवाक बदक, शेकाट्या, मूर हेन, शावलर बदक, पांढरा कंकर, काळा कंकर, ऑस्प्रे, पांढऱ्या मानेचा बगळा, सुरय, कंठेरी चिखली हे पक्षीही या ठिकाणी दिसतात. या सर्व स्थलांतरित पक्ष्यांमुळे पक्षी अभ्यासकांत या तलावाचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे तलावाला संरक्षणाची गरज असल्याचे येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयातील प्रा. सागर कुलकर्णी यांनी सांगितले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.