सातारा : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या दोन दिवसीय पूर्ण लॉकडाउनला आज सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी लॉकडाउनला जिल्ह्याच्या विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार, वाहतूक व्यवस्था बंद राहिल्याने सर्वत्र सामसुम दिसत होती.
गेल्या वर्षी पुकारलेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे कोरोनाचा प्रसार खंडीत होवून बाधितांची संख्या कमी होत चालली होती. तीन महिन्यांच्या प्रदीर्घ लॉकडाउन मागे घेत शासनाने अनलॉकची प्रक्रिया राबवत जनजीवन पूर्वपदावर आणले. जनजीवन पुर्वपदावर येत असतानाच मार्च महिन्याच्या अखेरीपासून कोरोनाबाधित वाढू लागले. यामुळे शासनाने शनिवार, रविवार पूर्ण लॉकडाउनची घोषणा केली. यास आज नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दूध, वर्तमानपत्रांची दुकाने, औषधे, किराणा दुकाने वगळता सर्व दुकाने व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवली. बाजारपेठच बंद असल्याने इतर दिवशी गर्दीने फुलून गेलेले रस्ते शनिवारी ओस पडले होते.
प्रशासनाने अत्यावश्यक कामासाठीच नागरीकांना बाहेर पडण्याचे केलेल्या आवाहनामुळे वैद्यकीय कारण सोडून इतर नागरिकांची वर्दळ फार कमी होती. अनावश्यक फिरणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी सातारा शहराच्या विविध चौकात पोलिसांनी तपासणी मोहीम हाती घेतली होती. जाणाऱ्या-येणाऱ्यांची चौकशी करत, त्यांचे ओळखपत्र, दवाखान्याची कागदपत्रे तपासूनच त्यांना त्याठिकाणाहून सोडण्यात येत होते. ज्यांच्याकडे बाहेर पडण्यासाठीचे सबळ कारण नव्हते अशांवर पोलिसांनी कारवाई करण्याचे सत्र देखील आरंभले होते.
सकाळच्या सत्रात राजवाडा परिसरात काहीजणांनी फळविक्री सुरु केली होती. मात्र, रस्त्यावर सामसुम असल्याने फळविक्री बंद करत त्यांनी घरचा रस्ता पकडला. लॉकडाउनची पुर्वकल्पना असल्याने अनेकांनी बाहेर गावचा प्रवास रद्द केल्याने एसटीच्या सर्व बसेस मध्यवर्ती आगारातच थांबून होत्या, तर रिक्षांचा वापर फक्त अत्यावश्यक कारणासाठीच सुरु होता. कोरोनाचे गांभीर्य घेत पुकारलेला लॉकडाउन नागरिकांनी उत्स्फूर्त पाळल्याने पोलिस यंत्रणेवरील ताण कमी झाल्याचे दिसून आले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.