चाफळकरांचे आरोग्य रामभरोसेच; अतिसार, गॅस्ट्रोसदृश लागणीमुळे धोका वाढला
चाफळ (जि. सातारा) : येथील पिण्याच्या पाण्याच्या नळ योजनेतून दूषित पाणीपुरवठा झाल्याने कालपर्यंत गावातील 100 पेक्षाही अधिक ग्रामस्थांना अतिसार व गॅस्ट्रोसदृश रोगाची लागण झाली. हे रुग्ण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी दवाखान्यांत उपचार घेत आहेत. साथ अद्याप आटोक्यात आलेली नाही. स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असतानाच शासनातील एकही अधिकारी चाफळला फिरकलेला नाही. गावकारभारी सरपंचांसह सदस्यही फिरकले नाहीत. त्यामुळे चाफळकरांचे आरोग्य आता रामभरोसे आहे. ही स्थिती निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुराडे व त्यांचे सर्व सहकारी या रुग्णांना सर्वतोपरी वैद्यकीय उपचार देत असून इतर खासगी दवाखान्यांतून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, दूषित पाणी हे टाकीसह विहिरीतही मिसळले असण्याची शक्यता असून, पाइपलाइनसह टाकीचे पूर्ण निरर्जंतुकीकरण करणे गरजेचे असताना ग्रामपंचायत अद्यापपर्यंत सुस्तच आहे.
गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन चार ते पाच दिवसांपूर्वी फुटल्याने गावात एक दिवस पाणीपुरवठा करण्यात आला नव्हता. त्यानंतर पाइपलाइन दुरुस्त झाल्यावर गावाला पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, पाण्याची टाकी साफ न करताच पाणी सोडल्यामुळे पाइपलाइनमधील घाण टाकीत गेल्याने गावात अतिसारसदृश साथीचा फैलाव झाला असावा, अशी शक्यता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. गावात लहान मुलांपासून मोठ्या नागरिकांना उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाला. या सर्व रुग्णांवर खासगी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचार सुरू आहेत.
गाव वाऱ्यावर अन् कारभारी हवेत!
गावात दोन ते तीन दिवस खळबळ उडालेली आहे. नागरिकांना त्रास होतो आहे. त्यांच्यात अचानक अशक्तपणा आला आहे. अशा स्थितीत नागरिक त्रस्त आहेत. काहींना उंब्रज, कऱ्हाड येथील दवाखान्यांत जावे लागले आहे. चाफळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगीतही बऱ्यापैकी उपचाराची सोय आहे. आजाराने रौद्ररूप धारण केलेले असताना गावचे कारभारी मात्र कुठेच दिसत नाहीत. ते सुस्तावलेलेच आहेत. सरपंच, उपसरपंच गायब आहेत. इतर पंचांना जनतेशी काही देणे-घेणे नाही असे वाटते. जनतेची काळजी घेण्यासाठी त्यांना निवडून दिले. मात्र, ते अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहेत, असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डी. वाय. पाटील यांनी केला आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.