धक्कादायक! मल्हारपेठेत अवैधरित्या कोविडसाठी रक्तचाचण्या केल्याचा प्रकार उघडकीस; लॅबचालकासह डॉक्‍टरवर गुन्हा

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

मल्हारपेठ (जि. सातारा) : कोविड रक्तचाचणीची कायदेशीर परवानगी नसताना येथील लॅबमालक आणि डॉक्‍टर यांनी अवैधरित्या कोविडसाठी रक्तचाचण्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवैधरित्या रक्त तपासणी करून रुग्णांची फसवणूक करणाऱ्या डॉक्‍टरसह रक्त तपासणी लॅबमालकावर गुन्हा नोंद आहे. येथील यशवंत लॅबचे मालक अनिल बाबूराव इनामदार (वय 45, रा. तांबवे, ता. कऱ्हाड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. यातील संशयित डॉ. उदय राजाराम वनारसे (रा. मल्हारपेठ) अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यात लॅबमालकास अटक झाली आहे, डॉक्‍टर फरारी आहे. नवसरी (ता. पाटण) येथील दत्तात्रय उदुगडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. 

फौजदार अजित पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवसरी येथील दत्तात्रय उदुगडे यांनी येथील पोलिसात जानेवारी महिन्यात तक्रार दिली होती. त्यात त्यांनी आपण थकवा जाणवल्याने येथील वनारसे हॉस्पिटलमध्ये तपासणीस गेलो. तेथे गेल्यानंतर त्यांनी मला रक्तासह अन्य चाचणी करावी, असा सल्ला देत त्या येथील यशवंत लॅबमध्ये तपासणी करण्यासही सांगितले. मी मुलगीसह लॅबमध्ये तपासणीस गेलो. त्यांनी तेथे मला कोरोनाची लक्षणे असल्याचे सांगून मरळी येथील कोविड हॉस्पिटल येथे जाण्यास सांगितले. मात्र, नातेवाईकांना माहिती समजल्यावर त्यांनी पुढील उपचारासाठी सातारा येथे हलवले. तेथे तपासणी करताना माझा येथील तपासणी अहवाल पाहिला. त्यावेळी ती तपासणी कोठे केली, असे त्यांनी विचारले. त्यावेळी आम्हाला शंका आली. त्यावेळी नातेवाईकांनी डॉ. वनारसे यांना व यशवंत लॅबोरोटरीजचे मालक अनिल इनामदार यांना फोनवर विचारले. त्यावेळी इनामदार यांनी फोनवरूनच तुमचा काय संबंध, तुम्हालाच खोट्या गुन्ह्यात अडकवेन, अशी धमकी दिली. त्यावरून येथील पोलिस व सातारा येथील आरोग्य विभागाकडे तक्रार केली होती. 

त्या तक्रारीवरून येथील लॅब मालकाविरोधात व त्यास मदत करणाऱ्या डॉक्‍टरविरोधात पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी चौकशी केली आहे. त्यात संबंधित अनिल इनामदार बेकायदेशीर लॅब चालवीत आहेत, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तक्रारदार दत्तात्रय उदुगडे यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचा अहवाल गेल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार लॅब आणि संबंधित डॉक्‍टरविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेतील संशयित लॅबमालक अनिल इनामदारला अटक झाली आहे. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. यातील संशयित डॉ. वनारसे फरारी आहे. 

लॅब केली सील 

पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या लॅबमध्ये छापा टाकून कसून चौकशी केली आहे. चौकशीत महत्त्वाची कागदपत्रे हाती आली आहेत. त्यामुळे ती लॅब पोलिसांनी सील केली आहे. लॅब अनिल इनामदार अवैधरित्या चालवत होते, तेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी तेथील साहित्य व कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.