साताऱ्यात कोरोनाचा विस्फोट! जिल्हाधिकाऱ्यांनी काढला 'कडक निर्बंधा'चा आदेश; जाणून घ्या काय सुरु, काय बंद..

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट झाल्याने जिल्हा प्रशासनाने आजपासून सोमवार ते शुक्रवारपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. विभाग प्रमुखाच्या परवानगीने आरटी-पीसीआर चाचणी केलेल्यानाच प्रवेश मिळणार आहे. जिल्ह्यात सर्व रेस्टाॅरंट व बार बंद राहणार असून शनिवार व रविवार दोन दिवस कडक लाॅकडाउन ठेवला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज आदेश काढले आहेत. 

कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाने "ब्रेक द चेन' या स्लोगनखाली कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यातून शनिवार व रविवार पूर्ण लॉकाडाउन असल्यामुळे अन्य दिवशी सर्व दुकाने सुरू राहणार का, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे; परंतु राज्य शासनाचा लेखी आदेश पाहता सोमवार ते शुक्रवारी रात्रीपर्यंतही केवळ अत्यावश्‍यक सेवेतील दुकानेच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर खासगी बस वाहतूकही सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी सात ते रात्री आठपर्यंतच सुरू राहणार आहे. 

राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांकडून वारंवार नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत होते, तरीही रस्ते व दुकानांवरील गर्दी कमी होत नव्हती. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून रात्री आठ ते सकाळी सात या कालावधीत संचार बंदी लागू करण्यात आली, तरीही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे काल (ता. 4) राज्य शासनाने "ब्रेक द चेन' हा उद्देश ठेवत निर्बंध लागू केले. त्यामध्ये शुक्रवारी रात्री आठ ते सोमवार सकाळी आठ या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या कालावधीत संपूर्ण व्यवहार बंद राहणार आहेत; परंतु त्यामुळे उर्वरित दिवसांमध्ये सर्व दुकाने सुरू राहणार नाहीत हे शासकीय आदेशावरून स्पष्ट होत आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरायला सोमवार ते शुक्रवारीपर्यंत रात्री आठ ते सकाळी सात, तसेच शुक्रवारी रात्री ते सोमवार सकाळपर्यंत अत्यावश्‍यक कारणाशिवाय पूर्णत: बंदी असणार आहे. 

अत्यावश्‍यक सेवेतील दुकानेच सुरू : राज्य शासनाच्या आदेशानुसार अत्यावश्‍यक सेवा (रुग्णालय, औषध दुकाने व आरोग्य सेवेशी संबंधित सर्व सुविधा, किराणामाल, भाजीपाला, दूध डेअरी, बेकरी, खाद्यपदार्थाची दुकाने, कृषी सेवा) सुरू राहणार आहेत. उर्वरित सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा मॉल पूर्णपणे बंद ठेवावी लागतील. 

प्रवासी वाहतूकदारांसाठी चाचणी सक्ती : सर्व प्रकारच्या माल वाहतुकीला परवानगी आहे. रिक्षातून दोन प्रवासी, टॅक्‍सीतून मर्यादेच्या 50 टक्के, तर बसमधून बसण्याच्या क्षमतेऐवढ्याच प्रवाशांची वाहतूक करायला परवानगी आहे. या प्रवासादरम्यान प्रत्येकाला मास्क आवश्‍यक आहे. प्रत्येक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाचे कोरोना लसीकरण झालेले पाहिजे किंवा कोरोना झालेला नसल्याबाबतचा 15 दिवसांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट त्याच्यासोबत आवश्‍यक आहे. रिक्षा किंवा टॅक्‍सीमध्ये चालकाने प्लॅस्टिक शिट लावून स्वत:ला प्रवाशांपासून वेगळे करून घेतले तर, त्यांना रिपोर्ट जवळ बाळगण्याची गरज असणार नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास चालकाला एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. 

खासगी कार्यालये राहणार बंद : सहकारी, शासकीय व खासगी बॅंका, वीज वितरण कार्यालय, दूरध्वनी सेवा देणारी, विमा, मेडिक्‍लेम कंपनी, औषध निर्माण कंपन्यांची ऑफिस व वितरक आदी सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त सर्व खासगी कार्यालये बंद ठेवावी लागणार आहेत. शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवायची आहेत; परंतु शासकीय कार्यालयात कोणत्याही नागरिकाला जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यासाठी शासकीय कार्यालयांनी ई- व्हिजिटर सिस्टीम सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अपवादात्मक परिस्थितीत शासकीय कार्यालयात भेट द्यायची झाल्यास संबंधित विभागाच्या प्रमुखाची परवानगी आवश्‍यक असणार आहे. त्यासाठी संबंधित नागरिकाचा 48 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट आवश्‍यक असणार आहे. शाळा व महाविद्यालयेही बंद ठेवली जाणार आहेत. 

"वीक एंड'ला खासगी वाहनांना प्रवासबंदी : खासगी बससह सर्व खासगी वाहनांना सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठपर्यंत वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत ही सेवा पूर्णत: बंद ठेवायची आहे. बसमधील कर्मचाऱ्यांनाही 15 दिवसांच्या आतला आरटीपीसीआरचा रिपोर्ट आवश्‍यक आहे. सार्वजनिक क्रीडांगणे वगळता जिम, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, जिमखाना, क्‍लब व चित्रपटगृह, व्हिडीओ गेम पार्लर, बंद राहणार आहेत. 

हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये पार्सल सुविधा : हॉटेल व रेस्टॉरंटची पार्सल आणि होम डिलिव्हरीची सुविधा सोमवार सकाळी आठ ते शुक्रवार रात्री आठपर्यंत सुरू राहील; परंतु शनिवार व रविवारी सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत केवळ होम डिलिव्हरी सेवाच सुरू ठेवायची आहे. या दिवशी हॉटेलमध्ये जाऊन पार्सल घेऊन जाता येणार नाही. लॉजिंगशी सलग्न असलेल्या हॉटेल व बारची सेवाही त्या लॉजमध्ये राहण्यासाठी आलेल्या ग्राहाकांसाठी सुरू ठेवता येईल; परंतु अशा ठिकाणी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला सेवा पुरवण्यास बंदी आहे. होम डिलिव्हरीची सेवा पुरवणाऱ्या व्यक्तीचे लसीकरण झालेले असणे किंवा त्याच्याकडे 15 दिवसांच्या आतील आरटीपीसीआर रिपोर्ट असणे बंधनकारक आहे. 

हातगाडीवाल्यांना होम डिलिव्हरीची सवलत : रस्त्याच्याकडेचे हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्यांच्या दुकानाच्या ठिकाणी नागरिकांना पदार्थ खायला देण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे; परंतु ते नागरिकांना पार्सल देण्याची, तसेच होम डिलिव्हरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे; परंतु पार्सल नेण्यासाठी थांबलेल्या नागरिकांकडून सामाजिक अंतर पाळले जाईल याची काळजी संबंधित विक्रेत्याने घ्यायची आहे. संबंधित विक्रीच्या ठिकाणी काम करणाऱ्यांकडेही 15 दिवसांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल असणे आवश्‍यक असणार आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने निवडणूक प्रचार 

सर्व सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे. निवडणूक असल्यास त्यासंबंधीच्या कार्यक्रमांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्‍यक असेल. त्यामध्ये 50 लोक किंवा एखाद्या बंदिस्त ठिकाणच्या बैठक व्यवस्थेच्या निम्मी संख्या यातील कमी संख्या असेल एवढ्या लोकांबरोबरच कार्यक्रम करता येणार आहे. खुल्या जागी जास्तीतजास्त 300 लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम करता येईल. अशा कार्यक्रमांवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना एखाद्या व्यक्तीची नेमणूक करावी लागेल. कोपरा सभा किंवा रॅलीमध्येही कोरोनाबाबतचे नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे.

साताऱ्यात 'हे' राहणार बंद

- सर्व दुकाने, मार्केट, मॉल 
- सर्व खासगी कार्यालये 
- मनोरंजन व करमणुकीची सर्व साधने 
- व्यायामशाळा, जलतरण तलाव, क्रीडा संकुले 
- सर्व रेस्टॉरंट व बार 
- सर्व प्रार्थनास्थळे व धार्मिक स्थळे 
- केशकर्तनालये, खासगी क्‍लासेस 
- यात्रा व धार्मिक कार्यक्रम 
- सभा, मेळावे, राजकीय कार्यक्रम 

'हे' राहणार सुरु

- सर्व शासकीय कार्यालये, सहकारी व खासगी वित्तीय संस्था 
- चार्टड अकांऊंट, विमा व मेडिक्‍लेम, वीज वितरण कार्यालये 
- खासगी वाहने व बससेवा 
- लॉजिंगमधील रेस्टॉरंट व बार 
- वृत्तपत्रे छपाई व वितरण 
- लग्न समारंभ 50 व्यक्ती व अंत्ययात्रा 20 लोकांना परवानगी 
- सर्व प्रकारचे उद्योगधंदे 
- राहण्याची सोय असणारी बांधकाम क्षेत्रे 
- बांधकामास परवानगी 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.