जादा पैशांच्या आमिषाने डॉक्‍टर, उद्योजक, बिल्डरांची फसवणूक; मुंबईतून सातारकरांना कोट्यवधींचा गंडा

Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News
Updated on

सातारा : मुंबईस्थित फायनान्शियल सर्व्हिसेस चालविणाऱ्या एका कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील हायप्रोफाईल गटातील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर येत आहे. जास्त व्याजाच्या व थोड्या काळात दुप्पट पैसे होण्याच्या आमिषांना बळी पडलेल्या या लोकांची अवस्था हाती धुपाटणे उरल्यासारखी झाली आहे. विशेष म्हणजे एकट्या वाई तालुक्‍यामध्येच अडीच ते तीन कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक झाली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांतील फसवणुकीचा आकडा मोठा असण्याची शक्‍यता आहे.

कोरोना संसर्गामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमध्ये उद्योग- धंदे बंद राहिले. त्यामुळे अनेकांना व्यापारात फटका बसला, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा पगार कपात झाली. याच कालावधीत जिल्ह्यातून शेअर मार्केटमधून जादा पैसे कमविण्याच्या आमिषाने कोट्यवधीची गुंतवणूक झाली; परंतु आता संबंधित कंपनीकडून पैसे मिळणे बंद झाल्याने, तसेच या प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल झाल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. पैशांची कोंडी झाल्यामुळे संबधितांनी आता पोलिसांकडे धाव घेण्यास सुरवात केली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीचे मुंबई येथे कार्यालय आहे. डिमॅट अकाउंट काढून देणे, शेअर बाजार म्हणजे काय, शेअर म्हणजे काय, शेअर बाजारात कमी कालावधीत जादा पैसे कसे मिळवायचे अशी माहिती देणारे व या संदर्भात क्‍लास सुरू केलेले या कंपनीचे अनेक व्हिडीओ यू ट्यूबवर उपलब्ध आहेत. या कंपनीचा मालक हा सोशल मीडियावरही चांगलाच ऍक्‍टिव्ह राहात असल्याचेही समोर येते आहे. त्याचे अनेक ट्विटस्‌ही सोशल मीडियावर उपलब्ध आहते. त्यामध्ये विशेषतः मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे, मुंबई पोलिस, महाराष्ट्र पोलिस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऍड्रेस केलेले संदेशही आहेत. त्या माध्यमातून समाजसेवा करत असल्याचा व राज्य आणि राष्ट्रहिताचा संबंधित मालक विचार करत असल्याचे दिसते; परंतु प्रत्यक्षात फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून कमी कालावधीत जास्त पैसे मिळवून देण्याच्या आमिषातून राज्यभरातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक गोळा केल्याचे समोर येऊ लागले आहे.

संबंधित कंपनीने राज्यातील काही ठिकाणी कार्यालये, तसेच अन्य भागात पैसे जमा करणारे मध्यस्त उभे केल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. कमी कालावधीत म्हणजे सुमारे आठ ते दहा महिन्यांत रक्कम दुप्पट करण्याचे आमिष या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना देण्यात आले होते. विश्‍वास वाटावा म्हणून याबाबतचा स्टॅम्प पेपरवर संबंधितांशी करारही करून दिला जात होता. त्याचबरोबर परताव्याच्या रकमेचे दर महिन्याचे आगाऊ चेकही गुंतवणूकदाराला दिले जात होते. सुरवातीच्या काळात गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे, तसेच काही कालावधीत दुप्पटही झाले. त्यामुळे त्यांनी आपल्या नजीकच्या अनेकांना यात पैसे गुंतविण्यास प्रवृत्त केले. त्यातच काही दिवसांपूर्वी या कंपनीवर मुंबई येथील एका पोलिस ठाण्यात फसवणूक व एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हाही दाखल झाला आहे. त्यामुळे आता आपले पैसे मिळणार का, असा प्रश्‍न सर्वांसमोर निर्माण झाला आहे. अनेकांनी आपली आयुष्यभराची पुंजीही यात लावली आहे. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत. गुंतवणूकदारांना न्याय मिळण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्तेही पुढे आले आहेत. त्यांच्या मदतीने या संदर्भात तक्रार अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतचा गुन्हा तातडीने दाखल करून गुंतवणूकदारांचे पैसे मिळवण्यासाठी काय करता येईल याबाबत पोलिस दलाने कार्यवाही करणे आवश्‍यक आहे.

डॉक्‍टर, उद्योजक, बिल्डरही...

सातारा जिल्ह्यातील अनेकांनी चार-पाच लाखांपासून ते 70 लाखांपर्यंतची रक्कम संबंधित कंपनीत गुंतविली आहे. त्यामध्ये डॉक्‍टर, उद्योजक, बिल्डर, शासकीय अधिकारी व निवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. काही जणांना गुंतवलेल्या रकमेच्या डबल पैसे मिळालेही. त्यांनी ती सर्व रक्कम पुन्हा त्याच कंपनीत गुंतविली; परंतु आता ती रक्कमही मिळणे बंद झाले आहे.

गुंतवणूकदारांना न्याय मिळावा

गुंतवणुकीच्या जादा परताव्याच्या अनुषंगाने आजवर अनेक कंपन्यांनी जिल्ह्यातील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. मोठा घोटाळा झाल्यावरच या गोष्टी समोर येत आहेत. तोपर्यंत गुंतवणूकदारांचे पैसे मिळण्याचा मार्ग बंद झालेला असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना न्याय मिळण्यासाठी, तसेच आणखी लोक अशा बाबींना बळी पडू नयेत, यासाठी पोलिस दलाकडून उपाययोजना करण्याचा पर्याय पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी शोधून काढणे आवश्‍यक आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.