कोरेगाव (जि. सातारा) : स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड हा सरदार आप्पाजी हरी यांच्या नेतृत्वात 18 मार्च 1773 रोजी तिसऱ्यांदा स्वराज्यात आला. या ऐतिहासिक घटनेला उद्या (ता. 18) 248 वर्षे पूर्ण होत आहेत. या मोहिमेत कोरेगावचे समशेरबहाद्दर खंडेराव बर्गे आणि त्यांच्या लोकांनी इतर सरदारांसह अत्यंत मोलाची कामगिरी बजावल्याचा उल्लेख काही ऐतिहासिक दस्ताऐवजात आढळला आहे.
कोरेगाव येथील ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग सुतार यांनी ही माहिती ऐतिहासिक दस्तावेजांसह दिली. "रायगड' ही स्वराज्याची राजधानी. मूळ नाव "रायरी.' चंद्रराव मोरे यांच्याकडून मे 1656 मध्ये हा किल्ला शिवाजीराजे यांच्या ताब्यात आला. छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदानानंतर तीन नोव्हेंबर 1689 मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या आदेशाने पाच जून 1733 मध्ये पुन्हा स्वराज्यात सामील झाला. त्यांच्या मृत्यूनंतर किल्ले रायगडचा हवालदार पोतनीस मराठ्यांच्या विरुध्द उठला, तेव्हा शाहू महाराजांचे वारसदार रामराजा यांनी 30 ऑगस्ट 1772 मध्ये किल्ले रायगड पेशव्यांच्या ताब्यात देण्याची आज्ञा केली. मात्र, त्याने आज्ञा पाळली नाही. त्यानंतर थोरले माधवराव पेशव्यांनी किल्ले रायगड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी सुरू केलेली मोहीम नारायणराव पेशवे यांनी सरदार आप्पाजी हरी यांचे नेतृत्वात 18 मार्च 1773 मध्ये पूर्ण केली आणि स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड तिसऱ्या वेळी स्वराज्यात आला.
या रायगड मोहिमेच्या मसलतीसाठी खंडेराव बर्गे आपल्या माणसांसहित आप्पाजी हरीच्या मदतीस गेले होते. किल्ले रायगड ताब्यात आल्यावर आप्पाजी हरींनी खंडेराव बर्गे यांच्यासह सर्व सरदारांना बरोबर घेऊन महाराजांच्या तख्तास मुजरा केला, त्यांनी नक्त पाच रुपये सिंहासनापुढे ठेवले व रुप्याची फुले सिंहासनावर उधळली. तख्तास पागोट्याची झालर लावली होती. आप्पाजींनी तेथेच दरबार भरविला आणि रायगडाची पुढील सर्व व्यवस्था लावून दिली. सरदारांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. या ऐतिहासिक अशा दिवसाचे साक्षीदार समशेरबहाद्दर खंडेराव बर्गे एक होते. खंडेराव बर्गे यांनी तत्पूर्वी आणि नंतरही स्वराज्य कार्यात अनेक मसलतीत सक्रिय असा सहभाग घेतलेला आढळतो. साधारण वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजे 1739 मध्ये खंडेराव बर्गे हे बाजीराव व चिमाजीआप्पा यांच्या नेतृत्वाखालील वसईच्या (साष्टीच्या) मोहिमेत सहभागी झाले होते. एका पत्रात ""खंडेराव बर्गे यांचे पथक साष्टीस रवाना केले'' असा आशयाचा स्पष्ट उल्लेख आढळतो.
वसईची मोहीम ही धर्मसंग्राम म्हणूनच पाहावी लागेल. कोकण पश्चिम किनारपट्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या मुहूर्तमेढीची खऱ्या अर्थाने पायाभरणी होती. स्वराज्याचे स्वप्न साकारले तेही याच भूमीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती थोरले शाहू महाराजांनी बाजीराव आणि चिमाजीआप्पा यांच्या नेतृत्वाखाली कोकण मोहिमेला पूर्णत्व दिले. मराठ्यांनी 1739 मध्ये पोर्तुगीजांशी झालेल्या युध्दात मुख्य स्थळ वसई काबीज करून हिंदू लोकांवर पोर्तुगीजांनी केलेल्या जुलमास व धर्मछळास कायमचा पायबंद घातला. म्हणून या वसईच्या युध्दास इतिहासात अनुपम महत्त्व प्राप्त झाले. ही मोहीम 1737 पासून 1739 पर्यंत चालली. या मोहिमेत अनेक सरदारांनी पोर्तुगीज घंटा आपापल्या कुलदेवतेस अर्पण केल्या. तशीच एक घंटा बर्गे घराण्याचे दैवत म्हसवडचे श्री सिध्दनाथ मंदिरास अर्पण केली आहे. ती आजही सुस्थितीत आहे. त्या घंटेवरील लेख "म्हसवडचा सिदोबा चरणी खंडेराव बरगे'असा आहे. इ. स. 1751 मध्ये विठ्ठल शिवदेव यांनी गुजरातवरील स्वारीची तयारी सुरू केली होती. तेव्हा राजश्री खंडेराव बर्गे आपल्या दोनशे राऊतांसहित दिमतीस पोचले होते. ही मोहीम फत्ते करून बर्गे परत आले, असेही दस्ताऐवज आढळले आहेत.
बर्गे घराणे स्वराज्याशी प्रामाणिक
सरदार खंडेराव बर्गे हे विश्वासू व पराक्रमी होतेच. स्वराज्याचा खजिना व कापड घेऊन जाण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवली होती, तसा उल्लेख असलेली अनेक अस्सल पत्रे प्रकाशित झाली आहेत. उपलब्ध असलेल्या दोन मार्च 1769 च्या पत्रात दौलताबादेस खजाना ठेवून तुम्ही सडे पुण्यास येणे, अशा आशयाचा आदेश आहे. बर्गे घराणे हे पहिल्यापासून स्वराज्याशी प्रामाणिक व विश्वासू सेवक म्हणून प्रसिध्द आहेत, याचा प्रत्यय अनेक वेळा आलेला आढळतो, असेही पांडुरंग सुतार यांनी सांगितले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.