फलटणच्या भुयारी गटार योजनेत मोठा भ्रष्टाचार; खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचे चौकशीचे आदेश

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

फलटण शहर (जि. सातारा) : फलटण शहरात भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. शहरभरात झालेल्या कामाची गुणवत्ता नियंत्रण तपासणी करावी, अशी सूचना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना चर्चेदरम्यान केली आहे. याबाबत माहिती घेऊन दोषी असतील तर कारवाई करू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

जिल्हा परिषदेतील बहुद्देशीय हॉलमध्ये खासदार नाईक निंबाळकर यांनी आज चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी सिंह यांना सूचना दिल्या. या चर्चेवेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, डॉ. प्रवीण आगवणे, नगरसेवक अशोकराव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, अभिजित नाईक निंबाळकर आदींची उपस्थिती होती. 
भुयारी गटार योजनेमध्ये शहरातील बहुतांशी भागातील रस्ते खोदून पाईप टाकण्यात आली आहे. ठिकठिकाणी चेंबरही बांधले आहेत. रस्ते खोदून ते व्यवस्थित न बुजविल्याने त्याचा त्रास शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. या योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, ते झाकण्यासाठी आता 14 कोटींचे रस्ते मंजूर करण्यात आले आहेत; परंतु या रस्त्यांची कामे होण्यापूर्वी या कामाची तपासणी गुणवत्ता नियंत्रणमार्फत व्हायला हवी, अशी सूचना खासदार निंबाळकर यांनी केली. 

या कामांबाबत गटनेते व नगरसेवक अशोकराव जाधव यांनी पालिका सभागृहात आवाज उठवला होता; परंतु सत्ताधारी गटाने त्याची दखल घेतली नाही. या योजनेच्या कामाची तपासणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्यासमवेत केली आहे. या पाहणी दरम्यान चित्रीकरणही करण्यात आले असून, या कामाबाबत जनहित याचिका दाखल केल्याचे खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित याची दखल घेऊन वर्क ऑर्डर थांबवावी अन्यथा आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. या कामाबाबत व त्याच्या दर्जाबाबत माहिती घेण्यात येऊन कोणी दोषी आढळल्यास कारवाई करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी सिंह यांनी खासदार नाईक निंबाळकर यांना दिले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.