मंत्री असावा तर असा! काळोखात तडफडत पडलेल्या रुग्णाला गृहराज्यमंत्र्यांचा 'आधार'

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

ढेबेवाडी (जि. सातारा) : रस्त्याशेजारील बंद दुकानाबाहेर उपचाराच्या प्रतीक्षेत तळमळत पडलेला घरातील कर्ता माणूस आणि कुणीतरी मदतीला धावून येईल, या आशेवर त्याच्या शेजारी चिमुरड्या कन्येसोबत वाटेकडे डोळे लावून बसलेली त्यांची पत्नी.. काल रात्री ढेबेवाडीत घडत असलेल्या या जिवावरच्या प्रसंगाबद्दल गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना त्यांच्या कार्यकर्त्याकडून मोबाईलवर माहिती मिळताच नियमांचा बागुलबुवा दाखवत हात आखडून बसलेल्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेला त्यांनी अक्षरशः घाम फोडत पळायला तर लावले, शिवाय त्या आजारी व्यक्तीला योग्य उपचार मिळवून देत सर्वसामान्य जनतेशी जोडलेली आपली नाळ अतूट असल्याची प्रचितीही पुन्हा एकदा दिली. 

ढेबेवाडीजवळच्या एका गावातील 45 वर्षीय व्यक्ती श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने काल सायंकाळी पाचच्या सुमारास उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आली होती. तेथे तपासणीत त्यांची ऑक्‍सिजन पातळी खूपच कमी झाल्याचे सांगत कोरोनासदृश लक्षणे असल्याने तातडीने कऱ्हाडला आयसीयुत ऍडमिट होण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर येथीलच एका खासगी दवाखान्यात गेल्यावर तेथेही त्यांना तातडीने पुढील उपचाराची गरज असल्याचे सांगण्यात आले. धाप लागल्याने पाय उचलत नसल्यामुळे येथील एका बंद दुकानाबाहेर संबंधित व्यक्ती अक्षरशः तळमळत पडली होती. त्यांच्या शेजारी पत्नी व छोटी मुलगी मदतीसाठी वाटेकडे डोळे लावून बसलेली होती. ये-जा करणारे लांबून विचारपूस करत होते. परंतु, पुढे जाऊन मदत करण्याचे धाडस मात्र कुणीच करत नव्हते. येथील व्यावसायिक व मंत्री देसाई यांचे कट्टर कार्यकर्ते प्रसाद जानुगडे यांना याबाबत समजल्यानंतर ते दुकान बंद करून तत्काळ मदतीला धावले. 

संबंधितांची विचारपूस करून त्यांनी मदतीसाठी ग्रामीण रुग्णालय व पोलिस ठाण्याचा दरवाजा ठोठावला. तेथे नियमांच्या चौकटीतील हतबलता लक्षात आल्यावर त्यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व त्यांचे स्वीय सहायक मिलिंद माळी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर मंत्री देसाई यांनी काही क्षणातच संबंधित यंत्रणेला पळायला लावले. त्या तिघांनाही प्रथम ग्रामीण रुग्णालयात नेऊन अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. ती निगेटिव्ह आल्यानंतर संबंधित व्यक्तीस पुढील उपचारासाठी कऱ्हाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. या काळात पोलिस व आरोग्य विभागाची यंत्रणा तेथे थांबून होती. रात्री उशिरापर्यंत मंत्री देसाई याबाबत मोबाईलवरून फॉलोअप घेत होते. आज सकाळीही त्यांनी मला फोन करून त्या रुग्णाच्या तब्येतीबाबत विचारपूस केल्याचे प्रसाद जानुगडे यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.