जिद्द असावी तर अशी! खोजेवाडीच्या विद्यार्थ्याने बनविला मोबाईल चार्जर; टाकाऊ वस्तूंपासून अनोखी नवनिर्मिती

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

नागठाणे (जि. सातारा) : कल्पकतेला मेहनतीचे, चिकाटीचे बळ लाभले तर नवनिर्मितीचे अवकाश फुलते. त्याची प्रचिती देताना ग्रामीण भागातील एका शाळकरी मुलाने टाकाऊ वस्तूंपासून मोबाईल चार्जर, हेडफोन तयार केला आहे. त्याच्या या अनोख्या सर्जनशीलतेचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. 

आयुष युवराज घोरपडे हे या मुलाचे नाव. सातारा तालुक्‍यातील खोजेवाडी हे त्याचे गाव. गावातील महाराष्ट्र हायस्कूलचा तो विद्यार्थी. सध्या सहावी इयत्तेत शिकतो. आयुषला बालपणापासूनच टाकाऊ वस्तू गोळा करण्याचा, त्या जपून ठेवण्याचा छंद आहे. त्याची निरीक्षणशक्ती अफाट आहे. कल्पकताही अचाट आहे. त्यामुळे तो कधी स्वस्थ बसत नाही. लॉकडाउन काळात त्याच्याकडे वेळच वेळ होता. त्या वेळेचा सदुपयोग आयुषने नवनिर्मितीसाठी वापरला. शिवराज घोरपडे हे त्याचे काका. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुषची सतत काही न्‌ काही धडपड सुरू असायची. अशातच वापरात नसलेल्या दोन स्पीकरच्या साह्याने त्याने हेडफोन तयार केला. तो शाळेत आणून विद्यार्थी अन्‌ शिक्षकांना दाखविला. सर्वांनीच त्याच्या या कलेचे कौतुक केले. 

त्यामुळे उत्साहित झालेल्या आयुषने पुढे छोट्या सोलर पॅनेलपासून मोबाईल चार्जर बनविला. जेमतेम 50 रुपये खर्चातील हा चार्जर पॉवरबॅक म्हणूनही वापरता येतो. सहजपणे हाताळता येतो. सोबत कुठेही नेता येतो. सौर ऊर्जेवर तो चार्ज करता येतो. नवनिर्मितीच्या या प्रवासात त्याला विज्ञान शिक्षक डी. एन. यादव, व्ही. बी. दुलारी, के. डी. जाधव आदींचे मार्गदर्शन, प्रोत्साहन लाभले आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, मुख्याध्यापक बी. जी. कांबळे तसेच शालेय व्यवस्थापन समिती, खोजेवाडीतील ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले आहे. 

आयुषकडे कल्पकता आहे, संशोधनवृत्ती आहे. त्याच्यात एक बालसंशोधक दडलेला आहे. शिक्षकांनी त्याला प्रोत्साहन दिले. त्यामुळे टाकाऊ वस्तूंतून अत्यंत कमी खर्चातील साधने आकाराला आली.'' 

-के. डी. जाधव, शिक्षक महाराष्ट्र विद्यालय, खोजेवाडी 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.