सातारा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना कामासाठी शासकीय कार्यालयांत जाण्यासाठी राज्य शासनाच्या "ब्रेक द चेन' आदेशानुसार एक प्रकारची बंदी असताना दस्त नोंदणी कार्यालयामध्ये मात्र, नागरिकांची गर्दी आहे तशीच आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचेही योग्य पद्धतीने पालन होत नसल्यामुळे शासनाच्या अजब कारभाराची चर्चा होऊ लागली आहे.
राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. राज्यात दररोज हजारोच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. जिल्ह्यातही आज कोरोनाबाधितांचा आकडा 922 वर गेला आहे. कोरोना संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करण्यासाठी व बाधितांची ही साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाउनचा निर्णय घेतला. "ब्रेक द चेन' या उद्देशाने काढलेल्या या आदेशामध्ये कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने, खासगी कार्यालये बंद ठेवावी लागत आहेत. हॉटेल, खाद्यपदार्थांचे हातगाडेचालक यांनाही केवळ पार्सल व होम डिलिव्हरी करण्याचाच अधिकार देण्यात आला आहे.
शुक्रवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी सातपर्यंत संपूर्ण लॉकडाउन असणार आहे. त्यामुळे अनेक व्यवसायांवर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर शासकीय कार्यालयांवरही शासनाच्या आदेशाने बंधने घातली आहेत. त्यानुसार शासकीय कार्यालयांत 50 टक्केच उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकाला शासकीय कार्यालयांत जाण्यास मनाई आहे. एखाद्याला अत्यावश्यक कामासाठी जायचे झाल्यास विभागप्रमुखांची परवानगी आवश्यक करण्यात आली आहे. परवानगी असली तरीही संबंधित व्यक्तीला आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सोबत असणे बंधनकार करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे लॉकडाउनच्या काळात शासकीय कार्यालयांत जाणे जवळपास दुरापास्त झाले आहे. वैयक्तिक अडचणी सोडवणाऱ्यावर बंधने आली आहेत.
सर्वसामान्यांशी संबंधित शासकीय कार्यालयांबाबत अशी परिस्थिती असताना जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहारासाठी मात्र, कोणतेही निर्बंध असल्याचे दिसत नाही. त्यामुळे दस्त नोंदणी कार्यालयामध्ये पूर्वीप्रमाणचे दस्त नोंदणीसाठी गर्दी होत आहे. त्याठिकाणी येणाऱ्या नागरिकांकडे आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल आहे किंवा नाही, हे पाहण्याचीही काही तसदी घेतली जात नाही. त्यामुळे ही कार्यालये पूर्वीप्रमाणचे सुरू आहेत. त्याचबरोबर सुरू असणाऱ्या खासगी आस्थापनांवर जसे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्बंध आहेत, त्याचीही या ठिकाणी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे कोरोना संसर्गावर प्रभावी उपाययोजना होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.